Tanaji Sawant : माजी मंत्री आणि भूम परंडा विधानसभा मतदारसंघाचे (Bhum Paranda Assembly Constituency) आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) नाराज असल्याच्या पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून तानाजी सावंत अद्याप एकदाही मतदारसंघात फिरकले नाहीत. यावरून माजी आमदार राहुल मोटे यांनी तानाजी सावंत यांना आमदारकी उद्योगधंद्याच्या संरक्षणासाठी पाहिजे, पुण्यात बसून ते उद्योगधंदे करत असल्याचा आरोप केलाय. तर पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपासून ते अनुपस्थित असून, त्यांच्या गैरहजेरीबाबत विविध चर्चा आणि आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आता यावर तानाजी सावंत यांच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. 

तानाजी सावंत यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, त्यांची नुकतीच हृदयावरील एन्जोप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते सध्या आराम करत असून अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सावंत यांची प्रकृती सध्या स्थिर

अधिवेशनात तानाजी सावंत उपस्थित नसल्याबाबत बातम्यांना उत्तर देताना, त्यांच्या कार्यालयाने त्या खोडसाळपणाच्या प्रयत्नाचा भाग असल्याचे म्हटले आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, सावंत यांची प्रकृती सध्या स्थिर असून, डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार ते अधिवेशनात हजेरी लावणार आहेत. तर निवडून आल्यानंतर आठ महिन्यांपासून तानाजी सावंत मतदारसंघातून गायब आहेत. ते मतदारसंघात कधी परतणार? याबाबत प्रसिद्धीपत्रकात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

मतदारसंघातील प्रश्न ऑनलाइन दाखल

तानाजी सावंत परंडा मतदारसंघाचे आमदार असून, त्यांनी तारांकित प्रश्न ऑनलाइन पोर्टलवर दाखल केल्याची माहितीही कार्यालयाने दिली आहे. दरम्यान, सावंत यांच्यावर माजी आमदार राहुल मोटे यांनी गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, "तानाजी सावंत निवडून आल्यानंतर गेले आठ महिने मतदारसंघात दिसलेले नाहीत. जनतेचे आभार मानण्यासाठीही ते आले नाहीत. जर त्यांना जनतेचे प्रश्न सोडवायला वेळ नसेल, तर त्यांनी राजीनामा द्यावा." त्यांनी असा दावा केला की, सावंत पुण्यात उद्योगधंदे सांभाळण्यात व्यस्त आहेत आणि त्यांना आमदारकी फक्त संरक्षणासाठी हवी आहे.

ठाकरे गटाचीही टीका

ठाकरे शिवसेनेचे उस्मानाबाद जिल्हाप्रमुख रणजीत पाटील यांनीही सावंत यांच्यावर तोफ डागली. त्यांनी म्हटले की, “आम्हाला जनतेचा प्रश्न सोडवणारा आमदार हवा आहे. जर ते शक्य नसेल, तर त्यांनी राजीनामा देऊन पुण्यातच बसावे,” अशी टीका रणजीत पाटील यांनी तानाजी सावंत यांच्यावर केलीय.

आणखी वाचा

Amit Shah retirement: अमित शाहांकडून राजकारणातून निवृत्तीबाबत भाष्य, मोहन भागवतांनी पंचाहत्तरीच्या मर्यादेची आठवण करुन दिली, चर्चांना उधाण