Tamil Nadu Government Formation DMK and AIADMK: गेल्या दोन दिवसांपासून तामिळनाडूत सुरु असलेल्या राजकीय नाट्यात एक मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत थलपती विजय यांचा तमिळगा वेत्री कळघम अर्थात TVK या पक्षाला सर्वाधिक 108 जागा मिळाल्या होत्या. मात्र, बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 118 या संख्याबळाची अद्याप जुळवाजुळव न करता आल्याने थलपती विजय (Vijay Thalapathy) यांच्या हातातोंडाशी आलेला मुख्यमंत्रिपदाचा घास हिरावून घेतला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यादृष्टीने तामिळनाडूत अशक्यप्राय अशी राजकीय समीकरणे आकाराला येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. (Tamil Nadu Election Result 2026)
तामिळनाडूत विजय थलपती यांनी राज्यपालांची दोनवेळा भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला होता. मात्र, या दोन्ही वेळेस राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी विजय यांना आधी 118 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र सादर करा, मग मी सत्तास्थापनेचे निमंत्रण देतो, अशी भूमिका घेतली होती. TVK पक्षाने तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक 108 जागा जिंकल्या आहेत. तामिळनाडूच्या 234 जागांच्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी 118 च्या संख्याबळाची गरज आहे. काँग्रेसच्या पाच आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या दोघांचे एकत्रित संख्याबळ 113 इतके झाले आहे. परंतु, विजय थलपति दोन मतदारसंघातून निवडून आल्यामुळे टीव्हीकेचे प्रत्यक्ष संख्याबळ 107 इतकेच मोजले जाईल. त्यामुळे टीव्हीके आणि काँग्रेस आघाडीचे एकत्रित संख्याबळ 112 इतके होते. त्यामुळे टीव्हीकेला आणखी सहा आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. तो अद्याप टीव्हीकेला मिळवता आलेला नाही.
टीव्हीकेची हीच अडचण ओळखून आता तामिळनाडूच्या राजकारणात द्रमुक (DMK) आणि अण्णाद्रमुक (AIADMK) या हाडवैऱ्यांनी एकत्र येण्याची तयारी सुरु केल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, द्रमुकच्या पाठिंब्यानं अण्णाद्रमुक पक्ष सत्ता स्थापन करु शकतो. अण्णाद्रमुकने स्टॅलिन यांच्याकडे पाठिंबा मागितल्याचे सांगितले जाते. डीएमकेने गुरुवारी बैठक घेऊन सर्व राजकीय निर्णय घेण्याचे अधिकार एम.के. स्टॅलिन यांना दिले आहेत. त्यामुळे अण्णाद्रमुकच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. अण्णाद्रमुकचे नेते पलानीस्वामी आज राज्यपालांना भेटण्याची शक्यता आहे. यावेळी किती आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांच्यासमोर सादर करणार, हे बघावे लागेल. एम.के. स्टॅलिन यांच्या द्रमुककडे 59 तल अण्णाद्रमुक पक्षाकडे 53 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यांच्या एकत्रित बेरीजही 112 इतकी होते. मात्र, आपल्या मित्रपक्षांना सोबत घेऊन तामिळनाडूतील ही नवी आघाडी 118 हा बहुमताचा आकडा गाठू शकते. तसे घडल्यास हा थलपती विजय यांच्या पक्षासाठी खूप मोठा धक्का ठरेल.
आणखी वाचा
