Sushma Andhare on Eknath Shinde : आज पुण्यातील कोंढवा कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) उपस्थित होते. या कार्यक्रमात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नेहमीप्रमाणे अमित शाह यांचे भरभरून कौतुक केले. त्यांनी भाषणात विविध विशेषणं आणि उपमांचा वापर करत अमित शाह यांची स्तुती केली. मात्र, भाषणाच्या शेवटी शिंदे यांच्याकडून घडलेली एक चूक चर्चेचा विषय बनली आहे. शिंदे यांनी भाषण संपवताना, "जय हिंद, जय महाराष्ट्र" असे म्हणत आपले भाषण समाप्त केले. पण काही क्षणांतच त्यांना काहीतरी आठवले आणि ते पुन्हा माईकपाशी येत म्हणाले, "जय गुजरात". या 'जय गुजरात' उच्चारामुळे सध्या मराठी अस्मितेचा मुद्दा ऐरणीवर असताना, शिंदे यांच्या विधानावरून मोठा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या घोषणेवरून शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.  

सुषमा अंधारे एबीपी माझाशी बोलताना म्हणाल्या की, मला त्यात काही आश्चर्य वाटत नाही. कारण महाराष्ट्र द्रोही निर्णय घेऊन महाराष्ट्राच्या अस्मिता दिल्लीश्वरांच्या पायथ्याशी वाहिल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपदाचे बक्षीस मिळाले आहे. त्यामुळे ते बक्षीस मिळाल्याने आपण सगळ्यात अतिउत्तम लाचार कसा? हे दाखवण्याची स्पर्धा सुरू झालेली आहे. ज्या पद्धतीने अजित पवारांनी सर्व ताब्यात घेतलेले आहे आणि एका अर्थाने शिंदे हे बऱ्यापैकी वेगळे झालेले आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा प्रवाहात येण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्यांना हे सगळं बोलणे गरजेचे आहे. या निमित्ताने एक गोष्ट स्पष्ट होते की, जिथे राज्याचा मुख्यमंत्रीपद भूषवलेली व्यक्ती जय गुजरात म्हणते, तिथे सुशील केडिया सारख्या व्यक्तींनी मी मराठी बोलणार नाही, काय करायचे ते करून घ्या? हा उन्नतपणा त्यांच्या ठायी येणे फार स्वाभाविक आहे. 

हा ट्रेंड आता आम्हाला चालवावा लागणार

जे या प्रदेशाच्या अस्मितेला नख लावण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्याशी आपण कसं वर्तन व्यवहार ठेवायचं, हे इथल्या मराठी जनतेला ठरवावे लागेल. भाजपने ज्या पद्धतीने नो हिंदी नो बिझनेस, असा ट्रेंड चालवला. आता इथल्या मराठी माणसाने नो मराठी नो कॉपोरेशन, नो मराठी नो बिझनेस, नो मराठी नो कनेक्शन, नो मराठी नो वोटिंग, हा ट्रेंड आता आम्हाला चालवावा लागणार आहे आणि आता तो प्रत्येक मराठी माणसाला चालवावा लागणार आहे. 

 ते फडणवीसंचय डोक्यावर पाय ठेवून उभे राहायला कमी करणार नाहीत

निश्चितपणाने हा राजकीय डावपेजांचा भाग आहे. जेव्हा मराठी माणूस एकवटत आहे. उद्या मराठी माणसाची एकजूट वरळीत दिसणार आहे. अगदी त्याच वेळेला गैरमराठी मतांचे एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न तितक्याच जोरदार पद्धतीने भाजप करणार आहे. भाजपाच्या गैरमराठी मतांच्या एकत्रीकरणामध्ये मी कसा तुमचा सगळ्यात मोठा मदतगार आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न म्हणून जाणीवपूर्ण जय गुजरात म्हणणे. कारण शिंदे ज्या ठाणे जिल्ह्यातून येतात, त्यात मीरा-भाईंदरची महापालिका आहे. तिथे बऱ्यापैकी अमराठी लोकांचा पट्टा आहे. त्यामुळे महापालिका निवडणूक तोंडावर असताना तिथल्या मतांना डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीचे वक्तव्य करणे असू शकते. तिकडच्या सगळ्या गुजराती मतदारांना याचा विचार करावा लागेल, जो माणूस ज्या मातीत जन्मला, ज्या मातीतून मोठा झाला, जो माणूस त्या मातीशी बेईमानी करू शकतो तो गुजराती लोकांशी काय इमानदार राहणार? उद्या संधी मिळाली तर ते देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यावर पाय ठेवून उभे राहायला कमी करणार नाहीत.

केम छो एकनाथ शिंदे साहेब : जितेंद्र आव्हाड 

एकनाथ शिंदेंच्या जय गुजरातच्या घोषणेनंतर राज्यातील विरोधकांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आता शिंदे साहेबांसोबत कसं बोलायचं? केम छो एकनाथ शिंदे साहेब, असं म्हणत डिवचलं आहे. विनाशकाले विपरीत बुद्धी. शिवसेना मराठी माणसासाठी उभी केली होती. या सगळ्यातून एकच म्हणावं वाटतं विनाशकाले विपरीत बुद्धी असंही पुढे ते म्हणालेत.

आणखी वाचा 

Eknath Shinde Jai Gujrat : अमित शाहांसमोर पुण्यात एकनाथ शिंदे म्हणाले, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात!