Suresh Kalmadi & Sharad Pawar: पुण्याच्या राजकारणातील एका कालखंडावर अनिभिषिक्त सत्ता गाजवणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी (Suresh Kalmadi Death) यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने पुण्यात निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. पुण्यातील कलमाडी हाऊस या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुरेश कलमाडी यांच्या निधनाने पुण्याच्या (Pune News) राजकारणातील एका पर्वाचा अंत झाला आहे. गेल्या काही काळापासून सुरेश कलमाडी हे आजारपणामुळे सक्रिय राजकारणापासून पूर्णपणे दूर होते. गेल्यावर्षीपासून त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यावेळी शरद पवार (Sharad Pawar) हे सुरेश कलमाडी यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात गेले होते. (Suresh Kalmadi Passes Away)
या भेटीत शरद पवार आणि सुरेश कलमाडी यांनी एकमेकांशी गप्पा मारल्या होत्या. शरद पवार हे सप्टेंबर 2025 मध्ये पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात कलमाडी यांच्या भेटीला गेले होते. त्यावेळी शरद पवार यांना समोर पाहताच सुरेश कलमाडी यांनी, ''हाऊ आर यु' असे विचारले होते. त्यावर शरद पवार यांनी, ''आय अॅम फाईन' असे उत्तर दिले होते. यानंतर शरद पवार यांनी डॉक्टरांकडून कलमाडी यांच्या प्रकृतीविषयी जाणून घेतले होते. या दोघांची ही अखेरची भेट ठरली. सुरेश कलमाडी यांचे पार्थिव आज दुपारी दोन वाजेपर्यंत कलमाडी हाऊस येथे अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे.
केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना सुरेश कलमाडी हे केंद्रीय मंत्री होते. पुण्याच्या राजकारणात सुरेश कलमाडी यांच्या नावाचा मोठा दबदबा होता. एकेकाळी “सबसे बड़ा खिलाड़ी, सुरेशभाई कलमाडी” या नावाने ओळखले जाणारे कलमाडी पुण्यातील राजकारणाचे समानार्थी मानले जात होते. पुण्यातून दिल्लीपर्यंत त्यांचा प्रभाव होता. 1995 ते 2007 या काळात काँग्रेसमध्ये आणि पुण्याच्या राजकारणात सुरेश कलमाडी यांचा दबदबा प्रचंड होता. राजकीय वर्तुळात त्यांना ‘भाई’ म्हणून संबोधले जायचे. त्यांच्या शब्दाला पुण्याच्या राजकारणात वजन होते. मात्र 2010 मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजन समितीचे अध्यक्ष असताना भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांच्या कारकिर्दीला मोठा धक्का बसला. त्यानंतर सुरेश कलमाडी यांचा राजकारणातील उतरणीचा काळ सुरु झाला होता. एप्रिल 2025 मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ED) या प्रकरणी सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टनंतर त्यांना क्लीन चिट मिळाली होती. मात्र, त्यानंतर सुरेश कलमाडी हे पुण्याच्या राजकारणात कमबॅक करु शकले नाहीत. गेल्या काही वर्षांपासून ते आजारपणामुळे राजकारणापासून दूर होते.
आणखी वाचा
