Suresh Kalmadi: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी (suresh kalmadi) यांचे वयाच्या 82 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने पुण्याच्या तसेच राष्ट्रीय राजकारणातील एक प्रभावी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. आज पुण्यातील कलमाडी हाऊस येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Continues below advertisement

पुण्याच्या राजकारणापुरतेच नव्हे, तर थेट दिल्लीच्या सत्ताकेंद्रात आपली ठसठशीत छाप उमटवणारे नेते अशी सुरेश कलमाडी यांची ओळख होती. एकेकाळी त्यांना राजकीय वर्तुळात ‘दिल्ली दरबारातील सबसे बडा खिलाडी’ असेही संबोधले जात होते. दिल्लीतील राजकीय लॉबिंग, प्रभावी संपर्क आणि रणनीती यासाठी ते विशेष ओळखले जात.

Suresh Kalmadi & Sharad Pawar : शरद पवार–कलमाडी मैत्रीचा राजकीय अध्याय

सुरेश कलमाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मैत्री ही देशाच्या राजकारणातील एक वेगळीच उदाहरण मानली जाते. या दोघांची मैत्री केवळ राजकीय नव्हे, तर वैयक्तिक पातळीवरही घट्ट होती. कलमाडी यांच्या आजारपणात शरद पवार यांनी रुग्णालयात भेट देत ही मैत्री अखेरपर्यंत टिकून असल्याचं दाखवून दिलं होतं. दिल्लीतील सत्ताकेंद्रात या दोन महाराष्ट्रातील नेत्यांचं मोठं वजन होतं आणि त्यांच्या राजकीय हालचालींचे अनेक किस्से कायम चर्चेत राहिले.

Continues below advertisement

Suresh Kalmadi & Sharad Pawar : 1991 नंतरच्या घडामोडींनी राष्ट्रीय राजकारणात खळबळ

विशेषतः 1991 सालानंतर घडलेल्या घटनांनी कलमाडी–पवार मैत्रीला राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आणलं. माजी काँग्रेस सरचिटणीस रशीद किडवाई यांनी आपल्या ‘24 अकबर रोड’ या पुस्तकात या काळातील घटनांचा सविस्तर उल्लेख केला आहे. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या 1991 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठं यश मिळालं. मात्र त्यानंतर देशाचा पंतप्रधान कोण होणार, यावरून काँग्रेसमध्ये तीव्र चढाओढ सुरू झाली. पी. व्ही. नरसिंह राव, शरद पवार, अर्जुन सिंग आणि डॉ. शंकरदयाल शर्मा ही नावे चर्चेत होती.

Suresh Kalmadi & Sharad Pawar : शरद पवारांसाठी ‘दिल्ली मॅनेज’ करण्याचा प्रयत्न

याच काळात राजीव गांधी यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे सुरेश कलमाडी यांनी शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठी थेट दिल्ली ‘मॅनेज’ करण्याची रणनीती आखली. दिल्लीतील पंचतारांकित हॉटेल्स, राजकीय लॉबिंग आणि प्रभावी नेटवर्क यासाठी ओळखल्या जाणाऱ्या कलमाडी यांनी नव्याने निवडून आलेल्या काँग्रेस खासदारांसाठी एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये भव्य आणि आलिशान डिनरचे आयोजन केले. या कार्यक्रमाला देशभरातील सुमारे 64 खासदार उपस्थित होते. या घटनेमुळे काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली. त्या काळात सक्रिय राजकारणात नसलेल्या सोनिया गांधी यांनाही या प्रकाराने धक्का बसल्याचं राजकीय वर्तुळात बोललं गेलं.

Suresh Kalmadi & Sharad Pawar : मित्रासाठी ताकद पणाला लावणारा नेता

यानंतरच्या नाट्यमय घडामोडींमध्ये शरद पवार पंतप्रधान होऊ शकले नाहीत आणि अखेर पी. व्ही. नरसिंह राव देशाचे पंतप्रधान झाले. मात्र, मित्रासाठी आपली सगळी ताकद, दिल्लीतील वजन आणि राजकीय मुत्सद्देगिरी पणाला लावणारे नेता म्हणून सुरेश कलमाडी यांची देशभर जोरदार चर्चा झाली. दिल्ली दरबारात मित्रासाठी लढणारा, सत्ता-समीकरणे हलवणारा नेता म्हणून सुरेश कलमाडी यांची भूमिका आजही भारतीय राजकारणातील एक लक्षवेधी आणि वेगळा अध्याय म्हणून ओळखली जाते.

आणखी वाचा

Suresh Kalmadi : सुरेश कलमाडींनी पुण्यात पंतप्रधानांच्या ताफ्यावर चप्पल फेकून मारली अन्... आजही सांगितल्या जातात आठवणी