Supriya Sule On Rohit Pawar: अजितदादांच्या अपघातावर रोहित पवारांना संशय; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस...
Supriya Sule On Rohit Pawar: अजित पवारांचा अपघात हा घातपात असल्याचा संशय रोहित पवारांनी व्यक्त केला. यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केलं आहे.

Supriya Sule On Rohit Pawar: अजित पवारांचा घातपात की अपघात (Ajit Pawar Death) असा प्रश्न अनेकांना पडला असताना आता त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. अजितदादांचा प्लॅन हा कारने जाण्याचा होता, पण आदल्या रात्री, काही कारणं काढून त्यांचा वेळ मुंबईत कसा जाईल, आणि दुसऱ्या दिवशी घाईगडबीत अजितदादा विमानाने जातील असं नियोजन करण्यात आलं होतं का? विमानाचे दोन्ही पायलट हे ऐनवेळी का बदलण्यात आले? असे सवाल रोहित पवारांनी उपस्थित केले. रोहित पवारांच्या या आरोपावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल शब्द दिला आहे की, या सगळ्याची ते चौकशी करतील. रोहित पवारांची अस्वस्थता सहाजिक आहे. त्याने अतिशय पारदर्शकपणे प्रश्न मांडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ते या सगळ्या प्रश्नांची सविस्तर माहिती घेऊन, पारदर्शक चौकशी करतील. त्यामुळे या चौकशीची वाट पाहू, असं सुप्रिया सुळेंनी सांगितले. तसेच रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेत पूर्व विदर्भातल्या नेत्याचं नाव घेतलं आहे. मात्र त्याबद्दल मला माहिती नाही, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळेंनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. (Supriya Sule On Rohit Pawar)
एका डोळ्यात अश्रू आणि एका डोळ्यात आनंद- सुप्रिया सुळे (Supriya Sule On Sunetra Pawar)
मी आणि सुनेत्रा वहिनी यापुर्वीही डीपीडीसीला एकत्र होतो. सुनेत्रा वहिनींवर ही नवीन जबाबदारी आहे. एका डोळ्यात अश्रू आणि एका डोळ्यात आनंद आहे. सुनेत्रा वहिनी पालकमंत्री झाल्याचा आनंद आहे. मात्र अजितदादा नसल्याचं दुःखही आहे. अजितदादा नसण्याचं दुःख कधीच भरून निघणार नाही. आजही खरं वाटत नाही की अजितदादा आपल्यात नाही. आमचं कुटुंब सध्या अडचणीतून जात आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
शरद पवारांची तब्येत खूप चांगली- सुळे (Supriya Sule On Sharad Pawar)
शरद पवारांची तब्येत खूप चांगली आहे. रूबी हॉल रूग्णालयाच्या स्टाफचे मी आभार मानते. शरद पवारांना उद्या रुग्णालायातून डिस्चार्ज मिळू शकतो, अशी माहिती सुप्रिया सुळेंनी दिली. शरद पवार जेव्हा हॉस्पिटलमधे होते तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केले होते. अजितदादानंतरच्या काळातही या सगळ्यांनी आमची साथ दिली त्याबद्दलही मी सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांचे आभार मानते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
























