मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्या कॉफी विथ कौशिक या विशेष कार्यक्रमात अनेक मुद्द्यांवरती भाष्य केलं. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत आपल्याला आधीपासून माहिती होती आणि त्याला विरोध नव्हता, असे तटकरे (Sunil Tatkare) यांनी स्पष्ट केले. मात्र, यापूर्वी त्यांनी याच मुद्द्यावर मौन बाळगल्याने आणि काही बाबी नाकारल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. अशातच याआधी या विलीनीकरणाच्या चर्चावरती बाळगलेलं मौन आणि काही मुलाखतींमध्ये दिलेला नकार यावरून सध्या सुनील तटकरे (Sunil Tatkare) टीकेचे धनी बनले आहेत. अशातच राष्ट्रवादी काँँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांकडून तटकरेंवर हल्लाबोल केला जात आहे. अशातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे (Shashikant Shinde)यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
Shashikant Shinde: मुळात आता का चर्चा करत आहेत?
शशिकांत शिंदे यांनी म्हटलंय की, आधी कोणी तरी बोलत होतं की, अजित पवार यांनी आमच्याशी कधीच चर्चा केली नाही. आता मात्र म्हणत आहेत की, चर्चा झाली होती. अजित पवारांनी विलीनीकरण करण्याबाबत चर्चा केली होती. मुळात आता का चर्चा करत आहेत कारण आम्ही आता महाविकास आघाडी म्हणून पुढे गेलो आहोत. आता विलीनीकरण चर्चा नाही कार्यकर्ते उगाच डिस्टर्ब होतात. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाचा विषय नाही कारण विलीनीकरण चर्चा अजित पवार यांच्यासोबत झाली होती. अजित पवारांना माहिती होतं की आगामी काळात मित्र पक्षांसोबत भाजप कसं वागणार आहे. तुम्ही सातारा उदाहरण पाहिलं की कशा प्रकारे भाजपने सत्ता हातात घेतली. त्यामुळे अजित पवार एकत्रीकरणासाठी आग्रही होते, असंही शशिकांत शिंदेंनी म्हटलं आहे.
Shashikant Shinde: विलीनीकरण चर्चा हा माझ्या हातातील विषय नाही
विलीनीकरण होणे हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली ठरेल असं तुम्ही म्हणत होतात आता काय अडचण आहे? ते एक पाऊल पुढे टाकत आहेत तुम्ही का टाकत नाही? या प्रश्नावर उत्तर देताना शशिकांत शिंदे म्हणाले की, 'तुम्ही मला खोदून खोदून विचारत आहात मात्र विलीनीकरण ही चर्चा माध्यमातून होतं नाही.' तुम्हाला प्रस्ताव आला तर विचार होईल की कायम स्वरुपी बाय बाय केलं? यावर उत्तर देताना शिंदे म्हणाले, "जर तरचा विषय नाही. विलीनीकरण चर्चा हा माझ्या हातातील विषय नाही. आमचे सर्व वरिष्ठ एकत्रित बसून निर्णय घेत असतात. शरद पवार आमच नेतृत्व आहेत. आम्ही महाविकास आघाडीत आहोत आणि कामाला सुरुवात देखील केली आहे. शरद पवार देखील लवकरच महाराष्ट्र दौरा करणार आहेत".
एबीपी माझाशी विलीनीकरणाबाबत बोलताना काय म्हणाले सुनील तटकरे?
दादांचं शव अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात पोस्ट मॉर्टम करुन आणलं पहिल्या दिवशी अंत्यसंस्कार दुसऱ्या दिवशी झालं. पहिल्या दिवशीच काही जबाबदार नेत्यांनी मुलाखती दिल्या की दादांची अंतिम इच्छा होती विलिनीकरणाची, विलीनीकरण अंतिम टप्प्यात आलं होतं. या तारखेला विलिनीकरण होणार होतं, आणखी एक सो कॉल्ड व्हिडिओ, दादा त्या बैठकीला बसलेत आणि ते सगळे असं तो झालं. सलग दोन दिवस त्या मुलाखती सुरु राहिल्या.
मी त्या वेळी बोलण्याच्या मानसिकतेत नव्हतो. बोललो असतो तर अश्रूंचा बांध आवरला नसता. ज्या पद्धतीनं ते सुरु झालं त्याचा अर्थ राजकीय अर्थ लक्षात आला की काही तरी घडतंय. विलिनीकरणाची चर्चा जाहीर करणं याचा अर्थ आता दादा गेलेत आणि विलिनीकरण थांबलं तर विलिनीकरण नंतर होईल. विलिनीकरणाचा टोटल सिनॅरिओ बदलतो. आता माझा काही त्याला विरोध होता असा भाग नाही. मला त्या गोष्टीची माहिती होती, असं सुनील तटकरे म्हणाले.
विलिनीकरण करु पण वहिनींना नेता निवडा असं त्यांच्यातील कोणी म्हटलं नाही. मी कराडला म्हटलं कोणत्या पक्षाचं कोणत्या पक्षात विलिनीकरण, आम्ही भाजपसोबत एनडीएसोबत आहोत. विलिनीकरण अंतिम टप्प्यात आलं होतं पण दादा असताना विलिनीकरण आणि दादा नसताना विलिनीकरण खूप फरक आहे ना, असं सुनील तटकरे म्हणाले.
