Sunil Tatkare on Navneet Rana: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या (Rajya Sabha) जागेवर कोणाची वर्णी लागणार, यावरून सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. या जागेवर भाजप नेत्या नवनीत राणा (Navneet Rana) यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) उमेदवारी दिली जाणार अशी जोरदार चर्चा रंगली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी ही चर्चा पूर्णपणे फेटाळून लावत "नवनीत राणा हा विषय राष्ट्रवादीकडून संपलेला आहे," असे स्पष्ट केले आहे. याच वेळी त्यांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेत त्यांनाही कडक शब्दांत सुनावले आहे.

Continues below advertisement

सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर या जागेवर सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची वर्णी लागेल, अशी चर्चा होती. मात्र, या शर्यतीत अचानक भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांची एन्ट्री झाली. भाजप नवनीत राणा यांच्यासाठी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडायला सांगेल, असे बोलले जात होते. त्यातच नवनीत राणा यांनी मुंबईत येऊन 'देवगिरी' बंगल्यावर सुनेत्रा पवार यांची थेट भेट घेतल्याने तर्कवितर्कांना उधाण आले होते. मात्र, तत्पूर्वी छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतल्याने भुजबळांचा दावा पक्का मानला जात आहे.

Sunil Tatkare on Navneet Rana: नेमकं काय म्हणाले सुनील तटकरे?

नवनीत राणा यांच्या उमेदवारीबाबत अधिक स्पष्टता देताना सुनील तटकरे म्हणाले की, "नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्याचा विषय संपलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीची बैठक संध्याकाळी होईल. त्या संदर्भातला अंतिम निर्णय सुनेत्रा पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ," असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस कोणाला राज्यसभेवर पाठवणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Continues below advertisement

Sunil Tatkare on Rohit Pawar: सुनील तटकरेंचा रोहित पवारांवर पलटवार

दरम्यान, या सर्व घडामोडींवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला होता. रोहित पवार म्हणाले होते की, "या जागेवरून छगन भुजबळ यांना संधी दिली पाहिजे. भाजप विचाराधीन किंवा भाजपच्या व्यक्तीला सुनेत्रा पवारांची जागा आहे, ती दिली गेली तर पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपच्या चरणी गेला असं म्हणावं लागेल, किंवा तो दिल्लीसमोर झुकलेला आहे, असा संदेश जाईल." रोहित पवारांच्या या सल्ल्यावर सुनील तटकरे यांनी तीव्र शब्दांत पलटवार केला. "आमच्या पक्षात आम्ही उमेदवारी कोणाला द्यावी याबाबत आम्हाला त्यांचा सल्ला घेण्याची पाळी आलेली नाही. त्यांनी त्यांच्या पक्षात पहिले सल्ले द्यावे. त्यांचे संख्याबळ कसे वाढेल यावर त्यांनी अधिक लक्ष केंद्रित करावे," असे सुनील तटकरे म्हणाले. 

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Sunetra Pawar and Navneet Rana: राज्यसभेसाठी छगन भुजबळ 15 तास वेटिंगवर, नवनीत राणा अचानक सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राष्ट्रवादीत हालचालींना वेग