Sunetra Pawar NCP: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी काल राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. पक्षनेता म्हणून सुनेत्रा पवारांकडे सर्व संवैधानिक अधिकारही सोपवण्यात आले. त्यामुळे सुनेत्रा पवारांचा राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचा मार्गही मोकळा झाल्याचं सांगण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसमोर आव्हानं कोणती? (What are the challenges Sunetra Pawar?)
- सगळ्यात मोठं आव्हान असेल पक्ष एकसंध ठेवणं...
- अजित पवारांच्या स्पीडशी मॅचअप करणं...
- पक्षाला अजितदादांच्या पश्चात नवी उभारी देणं...
- महायुतीच्या राजकारणात राष्ट्रवादीची ताकद अबाधित ठेवणं...
- पक्षातल्या जुन्या जाणत्या नेत्यांसोबत समन्वयाचा ब्रीज बांधणं...
- आगामी काळात पक्षाचा विस्तार करणं...
- दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भातल्या विषयाचा सोक्षमोक्ष लावणं...
उपमुख्यमंत्री होताच सुनेत्रा पवार काय म्हणाल्या? (Sunetra Pawar Deputy CM)
अजित पवारांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. आज त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्य भावनेने उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरशः भरून येत आहे. दादांच्या अकाली जाण्याने मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असला, तरी त्यांनी शिकवलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे. त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे काम करत राहीन. या कठीण क्षणी महाराष्ट्रातील जनतेने दिलेला प्रेमाची साथ हेच माझे बळ आहे. आपल्या विश्वासाच्या जोरावर, दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने पुढे चालत राहीन, असं सुनेत्रा पवार सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? (Devendra Fadnavis On Sunetra Pawar)
प्रसंग कठीण होता...पण, ज्या धीरोदात्तपणे सुनेत्रा पवार महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला, तो कौतुकास्पद, धाडसी आणि त्यांची प्रतिबद्धता अधोरेखित करणारा आहे. शुभेच्छा देण्याचा हा प्रसंग नाही...पण, अजितदादांचा वारसा त्या समर्थपणे चालवतील, हा मला विश्वास आहे. राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभल्या, त्यांची ही कारकिर्द यशस्वी ठरेल. भाजप आणि महायुती सरकार म्हणून या कठीण प्रसंगी, आम्ही अजित पवार यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सुनेत्रा पवारांचा परिचय- (Who Is Sunetra Pawar)
- वय 62 वर्षे, धाराशिवच्या तेरमध्ये 1963 ला जन्म
- वडील बाजीराव पाटील त्यावेळचे मोठे स्थानिक नेते
- माजी मंत्री, माजी खासदार पद्मसिंह पाटील हे सख्खे भाऊ
- 1983 ला संभाजीनगरच्या सरस्वती भुवन कॉलेजमधून कॉमर्सच्या पदवीधर
- 1985 ला भाऊ पद्मसिंह पाटलांच्या पुढाकाराने अजित पवारांशी विवाहबद्ध
- लग्नानंतरही सक्रीय राजकारणापासून दूरच
- काटेवाडीत सार्वजनिक शौचालये बांधण्यातील पुढाकार हे पहिले सामाजिक काम
- 2006 ला काटेवाडीचा निर्मल ग्राम पुरस्काराने गौरव, हागंदारीमुक्त गाव म्हणून जाहीर
- 2008-'बारामती हाय टेक टेक्स्टाईल पार्क'ची उभारणी आणि अध्यक्ष
- 2010 ला 'एनवायरनमेंटल फोरम ऑफ इंडिया'ची स्थापना
- सुनेत्रा पवार विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्तांपैकी एक
- 2011 पासून फ्रान्सच्या 'वर्ल्ड एंटरप्रेन्युअरशीप फोरम'या थिंक टँकच्या सदस्या
- 2017 पासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्य
- राष्ट्रवादी फुटल्यानंतर राजकीय कार्यक्रमात सहभाग सुरु
- 2024 च्या लोकसभा निवडणुकीद्वारे प्रथमच सक्रीय राजकारणात
- बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंकडून पराभूत
- 18 जून 2024 ला राज्यसभेच्या सदस्यपदी
- आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार
