Sunetra Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी काल राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी मुंबईतील लोकभवनात सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. 

अजित पवार यांचं 28 जानेवारीला सकाळी विमान अपघातामध्ये निधन झालं. त्यामुळे अजित पवारांच्या निधनाच्या अवघ्या तीन दिवसांनंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने इतकी घाई का करण्यात आली, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. तसेच सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत शरद पवार (Sharad Pawar) यांना विचारले असताना मला काहीही माहिती नाही, असं उत्तर त्यांनी दिलं. आता याचदरम्यान, एक महत्वाची माहिती समोर आली आहे. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला शरद पवार कुटुंबाचा विरोध नव्हता. मात्र अजित पवारांचे दहावे होईपर्यंत तरी थांबावे असे सर्व कुटुंबाचे मत होते. उपमुख्यमंत्री होण्यासाठी शरद पवारांच्या पक्षातून अन्य कुणीही इच्छुक नव्हते, अशीही माहिती समोर आली आहे. (Sunetra Pawar DCM Of Maharashtra)

पार्थ पवारांना भाजपकडून विरोध, जय पवारांना हिरवा कंदील- (BJP ON Parth Pawar And Jay Pawar)

सुनेत्रा पवार राज्यसभेच्या खासदार होत्या. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या जागेवर कोणाला राज्यसभेवर पाठवणार, याची चर्चाही आता रंगली आहे. याचदरम्यान, राज्यसभेवर पार्थ पवार यांना पाठवण्यास भाजपचा विरोध असून जय पवारांना राज्यसभेत पाठवण्यास भाजपचा हिरवा कंदील असल्याची माहिती समोर आली आहे. 17 तारखेला संध्याकाळी 5.30 वाजता सुनील तटकरे आणि सुप्रिया सुळे यांचीही एकत्र होण्याबाबत बैठक झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांच्या वर्तुळातून उच्चपदस्थ सूत्रांची माहिती आहे. 

उपमुख्यमंत्री होताच सुनेत्रा पवार काय म्हणाल्या? (Sunetra Pawar Deputy CM)

अजित पवारांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. आज त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्य भावनेने उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरशः भरून येत आहे. दादांच्या अकाली जाण्याने मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असला, तरी त्यांनी शिकवलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे. त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे काम करत राहीन. या कठीण क्षणी महाराष्ट्रातील जनतेने दिलेला प्रेमाची साथ हेच माझे बळ आहे. आपल्या विश्वासाच्या जोरावर, दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने पुढे चालत राहीन, असं सुनेत्रा पवार सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाल्या.

संबंधित बातमी:

Devendra Fadnavis: जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांचा प्रचार न करण्याचा निर्णय; अजित पवारांच्या निधनामुळे सर्व सभा रद्द

Sunetra Pawar NCP: एकसंध, विस्तार, ताकद...उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोरील मोठी आव्हाने कोणती?