Sunetra Pawar DCM Oath: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आज संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणार आहे. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असतील. या शपथविधीपूर्वी दुपारी 2 वाजता विधानभवनात राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत सुनेत्रा पवारांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड केली जाणार आहे. याचदरम्यान आता महत्वाची माहिती समोर आली आहे. (Sunetra Pawar DCM Oath)
अजित पवारांकडे उपमुख्यमंत्रिपदासोबतच अर्थ आणि इतर महत्वाचे खातेही होते. पण उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अर्थ खाते वगळता इतर खात्याची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडेच राहणार आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क आणि क्रीडा विभागाची जबाबदारी कायम राहणार आहे. अर्थसंकल्प अधिवेशनानंतर कदाचित अर्थ खात्याची जबाबदारी पुन्हा सुनेत्रा पवार यांना मिळू शकते. आज केवळ उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार शपथ घेतील. इतर कुणाचा ही शपथविधी नसणार आहे.
शपथविधीपूर्वी विधानभवनात राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक- (NCP Sunetra Pawar)
सदर शपथविधीपूर्वी दुपारी 2 वाजता विधानभवनात राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत सुनेत्रा पवारांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड केली जाईल. या बैठकीबाबत सुनील तटकरे यांनी विधिमंडळात पक्षाचं अधिकृत पत्रही दिलं आहे. दरम्यान आजच्या शपथविधीसाठी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar Oath Of Deputy Chief Minister) बारामतीहून मुंबईत दाखल झाल्या आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागेल.
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीआधी शरद पवार काय म्हणाले? (Sharad Pawar On Sunetra Pawar)
सुनेत्रा पवारांच्या आजच्या शपथविधी सोहळ्यावर विचारले असता मला माहिती नाही, मी सकाळी वाचलं, असं शरद पवार म्हणाले. अजित पक्षाची जबाबदारी सांभाळत होते, ते गेले आता कुणीतरी पुढे यायला पाहिजे. त्याच्यातून पक्षाने निर्णय घेतला. पक्ष त्यांचा आहे, त्यांच्या पक्षाने जे काही ठरवलं त्याची प्रचीती दिसत आहे. आमचा मार्ग वेगळा आहे. परिवार हा साथ देण्यासाठी बाकी राजकारण वेगळं, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. प्रफुल पटेल, सुनील तटकरे पक्षाचे प्रमुख आहेत. त्यामुळे तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी ठरवलं आहे, आम्ही त्यावर भाष्य करणार नाही, असं शरद पवार म्हणाले.
