Baramati : बारामती बिनविरोध करा, उमेदवारी मागे घ्या; सुनेत्रा पवारांचा हर्षवर्धन सपकाळांना पुन्हा फोन, शेवटच्या दिवशी काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष
Baramati By Election : निवडणूक लढवण्याचा निर्णय हा दिल्लीतून झाला असून दिल्लीतील नेत्यांच्या सल्ल्यानुसार उमेदवारी कायम ठेवायची की मागे घ्यायची हे ठरवलं जाणार असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे.

मुंबई : बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्यासाठी अवघा एकच दिवस उरला असताना राष्ट्रवादीच्या नेत्या आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुन्हा एकदा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांना फोन केला. काँग्रेसने उमेदवारी मागे घ्यावी आणि बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी अशी विनंती सुनेत्रा पवारांनी सपकाळांकडे केली असल्याची माहिती आहे. त्यामुळे काँग्रेस आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडूक जाहीर झाली आहे. त्यासाठी राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसनेही आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. 9 एप्रिल रोजी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.
अजितदादांच्या पश्चात होणारी निवडणूक ही बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी आणि महायुतीकडून प्रयत्न केले जात आहेत. ही जागा महाविकास आघाडीमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे होती. परंतु शरद पवारांच्या पक्षाने उमेदवार न दिल्याने काँग्रेसने या ठिकाणी उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी आता काँग्रेस उमेदवार मागे घेणार की लढण्याच्या भूमिकेवर कायम ठाम राहणार हे पाहावं लागेल.
Sunetra Pawar Call To Harshvardhan Sapkal : सुनेत्रा पवारांचा फोन
दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना पुन्हा एकदा फोन करून विनंती केल्याची माहिती आहे. दोन्ही नेत्यांमध्ये यावर चर्चा झाली आहे. परंतु, बारामतीची पोटनिवडणूक लढवावी हा निर्णय दिल्लीतून घेतला गेला आहे. त्यामुळे उमेदवारी मागे घेताना हाय कमांडशी चर्चा करावी लागेल, त्यांचा सल्ला घ्यावा लागेल असं काँग्रेसने म्हटलं असल्याची माहिती आहे.
सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत वर्षा निवासस्थानी भेट घेतली आहे. जवळपास 15 ते 20 मिनिटं फडणवीस आणि सुनेत्रा पवारांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. या पोटनिवडणुकीत भाजप मोठा भाऊ म्हणून सुनेत्रा पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आहे.
Baramati By Election : 47 उमेदवार अद्याप रिंगणात
दरम्यान, बारामती पोटनिवडणुकीत एकूण 53 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून, त्यापैकी बुधवारी सहा उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यानुसार आतापर्यंत 47 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.
ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू असून, उमेदवारांची समजूत काढण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत. विशेष म्हणजे या निवडणुकीत 25 पेक्षा अधिक उमेदवार पुणे जिल्ह्याबाहेरील असल्याने या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
ही बातमी वाचा:





















