Sunetra Pawar पुणे : राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार मुंबईच्या दिशेनं रवाना झाल्या आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं यासाठी त्यांच्या पक्ष आग्रही आहे. सुनेत्रा पवार यांच्यासोबत जय पवार आणि नरेश अरोरा हे देखील मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. उद्या दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या आमदारांची बैठक होणार आहे. उद्या सायंकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार यांचा राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची बैठक दुपारी 2 वाजता विधिमंडळातील सभागृहात होणार आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांकडून सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड होणार आहे. त्यानंतर त्यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी 5 वाजता पार पडेल, अशी माहिती आहे. यासाठी सुनेत्रा पवार, जय पवार हे बारामतीतून मुंबईकडे रवाना झाले आहेत.
अजित पवार यांच्या निधनामुळं बारामतीकरांवर दु: खाचा डोंगर कोसळला. यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या प्रमुख म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड होईल. त्यानंतर त्यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी होईल. आज अजित पवार यांना सावडण्याचा विधी झाला, त्यानंतर त्यांच्या अस्थी त्या सोनगाव येथील नीरा नदीत विसर्जित करण्यात आल्या.
मुंबईत राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल पटेल, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी विचारविनिमय करुन उद्या दुपारी आमदारांची बैठक बोलावली आहे. विधानसभेचे आमदार आणि विधानपरिषदेचे आमदार यांची बैठक उद्या दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून निवड होईल. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, अशी माहिती आहे.
सुनेत्रा पवार यांचा राजकीय प्रवास
बारामतीच्या पवार कुटुंबाच्या सून असलेल्या सुनेत्रा पवार यांना माहेरचा देखील राजकीय वारसा आहे. बारामती लोकसभा निवडणूक लढवण्यापूर्वी सुनेत्रा पवार सामाजिक कामांमध्ये सक्रिय होत्या. 2024 ची बारामती लोकसभा निवडणूक सुनेत्रा पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढवली होती. त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवलं होतं. आता त्या अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय होऊ शकतात.
