Sunetra Pawar and Congress: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याबाबत काँग्रेसने (Congress) सोशल मीडियावर केलेल्या 'गुंगी गुडिया' या उल्लेखावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांची पत्रकार परिषद सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण (Suraj Chavan) आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेसच्या कार्यालयात दाखल झाले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेसच्या भूमिकेचा निषेध केला. सूरज चव्हाण यांनी काँग्रेसच्या कार्यालयात जाऊन पक्षाकडे थेट जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. सुनेत्रा पवारांची माफी मागा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. 

यावेळी सूरज चव्हाण म्हणाले की, "कदाचित काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना इंदिरा गांधींचा विसर पडला असेल. आता आम्हाला बघायचं आहे की, सपकाळ साहेब आमची भेट घेतात का? आम्ही काँग्रेसच्या प्रत्येक कार्यालयात जाऊन जाब विचारू, तुमची महिलांना कमी लेखण्याची वृत्ती आहे का? सुनेत्रा पवार यांचं काम पाहून काँग्रेसच्या पोटात दुखत असेल. 'गुंगी गुडिया' अपशब्द वाटत नसेल, तर कुठेतरी त्यांची वैचारिक पातळी घसरल्याचे निदर्शक आहे. अशा पद्धतीची एक्स पोस्ट करून जाणीवपूर्वक बदनामी करणे, महिलांना कमी लेखणे हे प्रकार काँग्रेसने थांबवावेत," असे त्यांनी म्हटले. 

Sunetra Pawar and Congress: नेमका वाद काय?

काँग्रेसने (Congress) बीड (Beed) दौऱ्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) बोलत असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) शांत बसलेल्या दिसत होत्या. त्यावरून काँग्रेसने "सुनेत्रा पवार अजून किती दिवस 'गुंगी गुडिया' बनून राहणार?" असा सवाल उपस्थित केला होता. या पोस्टनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र आक्षेप घेत काँग्रेसवर महिलांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे.

NCP: राष्ट्रवादीचा निषेध आंदोलनाचा इशारा

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसने केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज सायंकाळी साडेचार वाजता पुण्यातील (Pune) बालगंधर्व चौक (Balgandharva Chowk) येथे आंदोलन करण्यात येणार आहे.

Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांचाही काँग्रेसवर निशाणा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही काँग्रेसवर टीका करत, "उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींबद्दल असे शब्द वापरताना काँग्रेसने मनाची नाही तर जनाची तरी लाज बाळगायला हवी होती. लाडक्या बहिणींनी काँग्रेसला 2026 च्याच निवडणुकीत उत्तर दिलं आहे," असे म्हटले.

Anjali Damania: अंजली दमानिया यांचाही निषेध

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनीदेखील काँग्रेसच्या भाषेवर आक्षेप घेत, "मी राष्ट्रवादीविरोधात अनेकदा लढले आहे. मात्र सुनेत्रा पवार यांच्यासाठी वापरलेले शब्द चुकीचे आहेत. मी त्याचा तीव्र निषेध करते," अशी भूमिका मांडली.

NCP: राष्ट्रवादी महिला आघाडीचा इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनीही काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत, सुनेत्रा पवारांचा 'गुंगी गुडिया' असा उल्लेख करणे ही काँग्रेसची 'बौद्धिक दिवाळखोरी' असल्याचा आरोप केला. तसेच काँग्रेसने तत्काळ माफी मागावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस योग्य पद्धतीने उत्तर देईल, असा इशाराही देण्यात आला.

आणखी वाचा 

Dhananjay Munde and Sunetra Pawar: सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे