Sudhir Mungantiwar vs Kishor Jorgewar: चंद्रपूर भाजपमधील गटबाजी आणि अंतर्गत वाद आता शिगेला पोहोचला असून, दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि किशोर जोरगेवार (Kishor Jorgewar) यांच्यातील संघर्ष सोडवण्यात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनीही आपली हतबलता व्यक्त केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. "चंद्रपुरातील वाद माझ्या आटोक्याबाहेर असून, आता याचा निर्णय थेट दिल्लीतूनच घेतला जाईल," असे संकेत चव्हाणांनी नागपुरातील भेटीत दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Sudhir Mungantiwar vs Kishor Jorgewar: चंद्रपूर महानगरपालिकेतील पराभवाचे पडसाद
नुकत्याच पार पडलेल्या चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या झोन समिती आणि महिला बालकल्याण समितीच्या निवडणुकांमध्ये भाजपला मोठा धक्का बसला. संख्याबळ अनुकूल असतानाही मुनगंटीवार-जोरगेवार वादामुळे भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी शुक्रवारी संध्याकाळी नागपूर गाठून 17 समर्थक नगरसेवकांसह प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली.
Ravindra Chavan: प्रदेशाध्यक्षांची हतबलता
या भेटीदरम्यान रवींद्र चव्हाण यांनी चंद्रपुरातील घडामोडींवर स्पष्ट नाराजी व्यक्त केली. यावेळी रवींद्र चव्हाण यांनी चंद्रपुरातील वाद हा माझ्या आटोक्याबाहेर आहे. चंद्रपुरात कोणताही नेता निरीक्षक म्हणून जाण्यास तयार नाही. त्यामुळे आता चंद्रपुरातील निर्णय हे दिल्लीतच घेतले जातील. आमच्याकडे आलेले प्रत्येक विषय आम्ही दिल्लीला पाठवू आणि तिथूनच यावर निर्णय घेतल्या जाईल, असं सांगत आपली हतबलता दर्शवल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
Sudhir Mungantiwar vs Kishor Jorgewar: निरीक्षकांचा राजीनामा
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच माजी राज्यमंत्री मदन येरावार यांची चंद्रपूर भाजपच्या निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातील टोकाच्या संघर्षामुळे त्यांनी चंद्रपुरात येण्याऐवजी आपल्या पदाचा राजीनामा देणे पसंत केल्याची माहिती समोर आली आहे. सुधीर मुनगंटीवार हे पक्षातील अत्यंत ज्येष्ठ नेते आहेत. खुद्द रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांनी मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात काम केले आहे. त्यामुळे मुनगंटीवार यांच्या विरोधात किंवा त्यांच्याशी संबंधित वादात पडायला राज्यातील कोणताही नेता तयार नसल्याचे चित्र सध्या भाजपमध्ये पाहायला मिळत आहे. या सर्व प्रकारामुळे चंद्रपूर भाजपमधील पेच अधिकच वाढला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
