Sudhakar Badgujar on Apoorva Hiray: सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्या पाठोपाठ माजी आमदार अपूर्व हिरे (Apoorva Hiray) यांचा देखील भाजपमध्ये प्रवेश होतोय. अपूर्व हिरे यांच्या भाजपमध्ये येण्याने पक्षाची ताकद वाढणार आहे. मात्र, पक्षात शह काटशहाचे राजकारण सुरू झाले का? असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण, बडगुजर यांच्या प्रवेशाला स्थानिक आमदार सीमा हिरे (Seema Hiray) यांनी विरोध केला होता. मात्र, अपूर्व हिरेंच्या भाजप प्रवेशाचे सीमा हिरे यांच्याकडून स्वागत केले जात आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात महापालिकेच्या 44 जागा आहेत. त्यापैकी शिवसेनेकडे 22 तर भाजपकडे 18 जागा आहेत. तर आरपीआयकडे 1, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 1 आणि मनसेकडे 2 नगरसेवक आहेत. त्यामुळे आगामी मनपा निवडणुकीत भाजपची ताकद वाढणार आहे. त्याचबरोबर कुरबुरी देखील वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता सुधाकर बडगुजर यांनी भाष्य केले आहे.  

सुधाकर बडगुजर म्हणाले की, भारतीय जनता पार्टीत देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कार्यकर्तुत्वावर विश्वास ठेवून कोणी येत असेल आणि गिरीश महाजन यांच्या कार्यकुशलेतवर विश्वास ठेवून कोणी येत असेल तर त्याचे स्वागत केले पाहिजे, या मताचा मी आहे. अपूर्व हिरे यांनी विधानसभेला मला मदतच केलेली आहे. विधानसभेच्या वेळेस त्यांनी माझे काम केले आहे. त्यांचे मी स्वागतच करणार, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 

अपूर्व हिरेंच्या पक्ष प्रवेशाचे स्वागत

सीमा हिरे यांनी तुमच्या पक्ष प्रवेशावेळी विरोध केला, आता अपूर्व हिरे यांना भाजपमध्ये आणून तुम्हाला कुठेतरी शह देण्याचा प्रयत्न केला जात आहे का? असे विचारले असता सुधाकर बडगुजर म्हणाले की, अपूर्व हिरे यांचा राजकीय प्रवास पाहिला तर तो वाखाणण्याजोगा आहे. त्यांचे चांगले काम आहे. यापूर्वी देखील ते भारतीय जनता पार्टीत होते. नंतर ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीत गेले. त्यानंतर ते उभाठामध्ये आले. मात्र, त्यांनी मला मदतच केलेली आहे. त्यामुळे मी त्यांचे स्वागतच करेन, असे त्यांनी म्हटले. 

पश्चिम मतदारसंघात भाजपला 38 जागा मिळणार

नाशिक पश्चिम मतदार संघात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची ताकद वाढत आहे. आता तुमची पुढची रणनीती काय असणार? असे विचारले असता सुधाकर बडगुजर म्हणाले की, एकूण 44 जागा आमच्या विधानसभा मतदारसंघात येतात. त्यापैकी 35 ते 38 जागा भारतीय जनता पक्षाला मिळतील, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. 

भाजप पदाधिकाऱ्यांकडून माझ्या प्रवेशाचे स्वागत

तुमच्या भाजप प्रवेशानंतर पक्षात नाराजी कमी झाली की अजूनही कायम आहे. याबाबत विचारले असता सुधाकर बडगुजर म्हणाले की, नवीन पक्षप्रवेश झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये थोड्याफार प्रमाणात नाराजी असते. एकमेकांसमोर निवडणुका लढलेल्या असतात. त्यामुळे कदाचित थोडा राग असतो. तो जाण्यासाठी थोडा वेळ जाऊ द्यावा लागतो. पण भाजपचे सर्व पदाधिकारी येऊन मला भेटले आहेत. त्यांनी माझ्या पक्षप्रवेशाचे स्वागत देखील केले आहे, असे त्यांनी म्हटले. 

त्या स्वागत करत असतील तर चांगलीच गोष्ट 

तुमच्या पक्षाप्रवेशाला सीमा हिरे यांचा विरोध होता. आता अपूर्व हिरे यांच्या पक्ष प्रवेशाचे सीमा हिरे स्वागत करत आहेत. याबाबत विचारले असता चांगले आहे ना. त्या स्वागत करत असतील तर चांगलीच गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया सुधाकर बडगुजर यांनी दिली आहे. 

आणखी वाचा 

Nashik News: अधिवेशनाच्या सुरुवातीलाच भाजपचा धमाका, उत्तर महाराष्ट्रातील दोन बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश, कुणाल पाटील, अपूर्व हिरेंच्या हातात कमळ?