Sudhakar Badgujar Nashik Politics News: ठाकरे गटाच्या शिवसनेचे (UBT Shiv Sena Nashik) उपनेते सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. आज ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी यांनी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. महत्त्वाचं म्हणजे या पत्रकार परिषदेला उपनेते सुधाकर बडगुजर अनुपस्थित होते. पत्रकार परिषद सुरु असताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड यांना फोन आला. यावेळी सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करा, असे आदेश उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी दिले. 

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे नाशिकमध्ये असतानाच सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर नाशिकमधील राजकारण (Nashik Politics News) चांगलेच रंगले होते. तसेच सुधाकर बडगुजर यांनी नाराजी देखील व्यक्त करुन दाखवली. त्यानंतर आज ठाकरे गटाने सुधाकर बडगुजर यांनी पक्षातून हकालपट्टी केली. पक्ष विरोधी कारवाई केल्यानं हकालपट्टी केल्याची माहिती देण्यात आली आहे. 

कोण आहेत सुधाकर बडगुजर? 

2007 पासून सुधाकर बडगुजर यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. 2007 मध्ये ते नाशिक महापालिकेत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यावेळी शिवसेनेचे नगरसेवक तथा माजी महानगरप्रमुख विनायक पांडे हे अपक्ष नगरसेवकांच्या पाठिंब्यावर महापौरपदी विराजमान झाले होते. तेव्हाच्या अपक्षांच्या गटात सुधाकर बडगुजर यांचा समावेश होता. यातूनच बडगुजर शिवसेनेच्या संपर्कात आले. 14 जून 2008 रोजी एका जलकुंभाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बडगुजर यांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश झाला. 

तीन वर्षे नाशिक महापालिकेचे सभागृहनेतेपद-

अभ्यासू आणि आक्रमक शैलीमुळे बडगुजर यांच्याकडे पक्षाने 2009 ते 2012 अशी तीन वर्षे नाशिक महापालिकेचे सभागृहनेतेपद सोपविले. पुढे नाशिक महापालिकेची सत्ता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे गेल्यानंतर 2012 ते 2015 अशी तीन वर्षे बडगुजर यांनी विरोधी पक्षनेतेपद भूषविले. 2014 मध्ये त्यांना पक्षाने नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली यात त्यांचा पराभव झाला. 2019 साली नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाने सुधाकर बडगुजर यांना पुन्हा एकदा संधी दिली होती. मात्र, यंदा देखील सुधाकर बडगुजर यांचा पराभव झाला. सुधाकर बडगुजर हे याआधी नाशिक जिल्हाप्रमुख होते. आता त्यांची उपनेते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर माजी नगरसेवक डी जी सूर्यवंशी यांची नाशिक जिल्हा प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे.

सुधाकर  बडगुजर यांची वादग्रस्त प्रकरणेही समोर-

बडगुजर यांच्यावर काही वादग्रस्त प्रकरणेही आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान शासकीय कामकाजात अडथळा आणल्याच्या प्रकरणात 2023 मध्ये त्यांना एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली . तसेच, 2023 मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने त्यांच्याविरुद्ध फसवणूक आणि गैरवर्तनाच्या आरोपांखाली तक्रार दाखल केली. अलीकडेच, बडगुजर यांनी नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, ज्यामुळे त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले. सुधाकर बडगुजर हे नाशिकमधील राजकारणातील प्रभावशाली नेते असून, त्यांच्या राजकीय हालचालींकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

बडगुजरांना सलीम कुत्ता प्रकरण भोवले-

1. सलीम कुत्ता हा मुंबई बाँबस्फोटांमधला आरोपी

2. जिल्हाध्यक्ष असताना सुधाकर बडगुजरांची सलीम कुत्तासोबत पार्टी

3. बडगुजरांच्या नातलगाच्या फार्म हाऊसवर सलीम कुत्तासोबत पार्टी

4. भाजप आ.नितेश राणे, मंत्री दादा भुसेंकडून चौकशीची मागणी

5. नाशिक गुन्हे शाखेकडून बडगुजर-कुत्ताच्या पार्टीची चौकशी 

6. बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधात्मक कायद्यानुसार आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा

7. बडगुजरांना काही भेट वस्तू दिल्या गेल्याचं चौकशीत निष्पन्न

8. दहशतवाद्यासोबत पार्टी केल्यानं बडगुजरांविरुद्ध एसीबीकडून गुन्हा

सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टीनंतर पहिली प्रतिक्रिया 

ठाकरे गटाने पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी एबीपी माझाशी बोलताना पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पक्षात नाराजी व्यक्त करणे हा काही गुन्हा नाही, पक्षाने जी कारवाई केली आहे त्यावर मी योग्य वेळी उत्तर देईन. आज पक्षाने पत्रकार परिषदेचा आयोजन केलं होतं पण मी नाशिक बाहेर असल्याने या पत्रकार परिषदेला गेलो नाही. त्याबाबत मी जिल्हाध्यक्षांना कळवलं होतं. पण मी मुख्यमंत्र्यांना भेटलो म्हणून जर माझ्यावर कारवाई होत असेल तर ती चुकीची आहे. पक्षाने कोणाची हकलपट्टी करायची कोणाला पक्षात ठेवायचं हा पक्षाचा निर्णय आहे. त्यावर मी सध्या काहीही बोलू इच्छित नाही मी योग्य वेळी माझी प्रतिक्रिया देईन. माझी पुढची भूमिका काय असेल हे मी वेळ आल्यावर सांगेन. पक्षातून हकालपट्टी होईल अशी कोणतीही कुणकुण लागलेली नव्हती. मी पक्षातील भूमिकांबद्दल नाराजी व्यक्त केली होती मात्र नाराजी व्यक्त करणे हा गुन्हा असेल तर ते योग्य नाही.पक्षप्रमुखांनी संधी दिली असती तर भेटलो असतं पण आता हकलपट्टी झाली आहे तर पक्षप्रमुखांचे भेट घेण्याचा प्रश्न नाही. अचानक निर्णय झाला, पक्षाचा निर्णय होता, पक्षाने घेतला. इतर कोण कोण नाराज आहेत त्यांची नावं मी घेणार नाही, असं सुधाकर बडगुजर यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.

सुधाकर बडगुजर यांची ठाकरे गटाकडून पक्षातून हकालपट्टी, VIDEO:

संबंधित बातमी:

सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी, संजय राऊतांचा फोनवरुन निर्णय