Sunetra Pawar : सोमेश्वर कारखाना (Someshwar Cooperative Sugar Factory Election ) आपल्या प्रपंचाचा आधार आहे. मी इथे एका महत्त्वाच्या भूमिकेत आहे म्हणून उभी नाही, मी दादांची अर्धांगिनी एक माया, एक सून म्हणून आणि एक मुलगा गेल्या नंतर ही मी तलवार हातात न घेता जनतेची काळजी घेतलेली अहिल्यादेवीची लेक म्हणून उभी असल्याचे मत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले. दादांना जाऊन आठ महिने झाले त्यांच्या नंतरची ही पहिली निवडणूक आहे. आपण सर्वजण पोरके झालो आम्ही जास्त पोरके झालो, दादांची शिकवण होती, आपण रडायचं नाही, लढायचं असेही त्या म्हणाल्या. मी भावनिक होते मला कशाचही रडायला येतं पण दादांना ते आवडत नसायचं, तुम्हा कोणाला पोरकं होऊ द्यायचं नाही म्हणून मी उभा राहिल्याचे सुनेत्रा पवार म्हणाल्या.
तुम्ही दादांवर खूप प्रेम केले, ते या जन्मात फिटणार नाही
प्रचारात मी गावागावात फिरले कोणाच्या अंगणात बसले, ओसरीवर बसले पण प्रत्येक ठिकाणी दादाचं होते. कोणाच्या फोटोत होते, कोणाच्या डोळ्यात होते असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या. प्रत्येकाच्या हृदयात दादाचं होते. तुम्ही दादांवर खूप प्रेम केले, ते या जन्मात फिटणार नाही. हेच माझ्यावर कर्ज आहे असे मी समजते. ते फेडल्याशिवाय मी थांबणार नाही. दादांच्या पश्चात अशा प्रकारे निवडणुकीला सामोरे जावे लागेल मला स्वप्नात वाटले नव्हते. अनेक अनुभव आले उलट त्यांचे मी आभार मानले पाहिजेत. कारखाना कोणाची एकाची मालकी नाही, तो सभासदांचा आहे दादाही मालक नव्हते मी तर अजिबात नाही, दादांना केवळ राखणदारी केल्याचे त्या म्हणाल्या. मी दादांचा काम करत चाळीस वर्ष पाहत आली आहे, मला माहित होतं सहकाराची ताकद ऐकीत आहे. दादांसारखं नेतृत्व आजपर्यंत होतं, म्हणून राज्यात सर्वाधिक दर देणारा कारखाना म्हणून आपण अभिमानाने सांगतो असेही त्या म्हणाल्या.
मी संयमी आणि शांत आहे जरूर पण त्याचा अर्थ कमजोर अजिबाद नाही
मी संयमी आणि शांत आहे जरूर पण त्याचा अर्थ कमजोर अजिबाद नाही. संवादावर सर्वांना सोबत घेण्यावर माझा विश्वास आहे. दादांच्या विचाराला सर्वोच्च विचारला प्राधान्य देणाऱ्यांवर माझा विश्वास आहे. सर्वांच्या सहमतीने हे पॅनल तयार केलं आहे. दादांप्रमाणे मी नवीन आणि जुन्यांना संधी दिली आहे. देव सुद्धा सर्वांना समाधानी करू शकत नाही आपण तर माणसं आहोत. ज्यांनी अर्ज माघारी घेतले आणि त्यांनी दुसऱ्या दिवशीपासून खऱ्या मनाने प्रचार केला त्यांचं मी मनापासून अभिनंदन करते. ज्यांनी जाहीर पाठिंबा दिला त्यांचे आभार मानते.
अंधारात ठेवून त्यांनी ऐनवेळी संधी साधली
या निवडणुकीत मला अनेक गोष्टी नव्याने शिकायला मिळाल्या. ज्यांच्यावर आपण भरोसा ठेवला त्यांनी आपल्याला बेसावध ठेवून अगोदरच सर्व तयारी करुन ठेवली होती. अंधारात ठेवून त्यांनी ऐनवेळी संधी साधली. त्या भस्मासुराच्या विरोधात आपला लढा आहे असा इशारा नाव घेता पुरुषोत्तम जगताप यांना दिला. दादा गेल्याचं मी अजिबाद भांडवल करत नाही, काही लोक म्हणतात की भावनिक होते. जे बाजूला गेले त्यांना दादांची खरच प्रेरणा होती की दादांची अडचण होती. दादांचे फोटो वापरून दादांच्या नावाचा जोगवा का मागितला? असा सवाल त्यांनी केला. मी भावनिक आहे, मी तर त्याचं कुटुंब आहे दिशाभूल करण्याचा कार्यक्रम यांनी पहिल्या दिवसापासून केला. दादांचे फोटो वापरले दादांचा आवाज वापरला शेवटी माझा सुधा्दा आवाज वापरला नक्की सर्वांना भुलवतय कोण? कुठलं मार्केटिंग चाललं आहे असी टीका त्यांनी विरोधकांवर केली.
ताटाखाली राहणारी मांजर त्यांना हवी होती
दादांनी शेवट पर्यंत त्यांचा शब्द पाळला, दादा त्या दिवशी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी येत होते. जनतेच्या भल्यासाठी दादांचा प्रत्येक क्षण असायचा, आम्ही कुटुंबीय दादांना म्हणायचो की कधीतरी आम्हाला वेळ द्या. दादांनी जायच्या अगोदर मुलांना सांगितले की आता जिल्हा परिषदेची निवडणूक झाली की तीन वर्षे कोणतीही निवडणूक नाही मग तुम्हाला खूप वेळ देतो असे सांगत असताना सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर झाले. मी देखील जनतेचा विडा उचलला आहे. तुमची ही वहिनी शेवट पर्यंत तुमच्या सोबत राहील असे सुनेत्रा पवार म्हणाल्या. पुढील पॅनलमध्ये उमेदवार पाहिले तर पाच नावे जुनी आहेत, बाकीचे सर्व नवीन आहेत. त्यांना कारखान्याचा कारभार संपायला त्यांची टर्म संपेल, ताटाखाली राहणारी मांजर त्यांना हवी होती, असं यातून दिसून येते असं म्हणत त्यांनी पुरुषोत्तम जगताप यांना टोला लगावला.
कोणी सभासदांच्या मालकीला नख लावायचा प्रयत्न केला तर मागेपुढे पाहणार नाही
कोणत्याही निवडणुकीत निरीक्षक असतो, पण मी स्वतः इच्छुकांच्या मुलाखत घेतल्या. खरी गोम इथून सुरू झाली.आजपर्यंत तुम्ही मायाळू वाहिनीचे रूप बघितले आहे, प्रत्येक महिला दुर्गाही असते. कोणी सभासदांच्या मालकीला नख लावायचा प्रयत्न केला तर मग अजिबात मागेपुढे पाहणार नाही. सोमेश्वर दादांचा स्वाभिमान होता. त्याच्यावर काही मंडळींनी घाला घालण्याचा प्रयत्न केला सभासद त्यांना उत्तर देतील असे सुनेत्रा पवार म्हणाल्या. 1992 साली दादांनी कारखाना हाती घेतला तेव्हा कारखाना कर्जबाजारी होता. वेळ प्रसंगी त्यांनी त्यांची आमदार की देखील पणाला लावली हे सभासदांना माहिती आहे. दादांनी कारखान्याचे टप्प्या टप्प्याने विस्तारीकरण केले. या मंडळींना दादांशिवाय अजिबात जमले नसते. कारखान्याचे आजचे यश दादांच्या शिस्तीमुळे दादांच्या धाकामुळे कष्टामुळे आहे असे त्या म्हणाल्या.
जे जे दादा करत होते ते इतरांना जमणं अशक्य आहे
देशपातळीवरील मदत मिळवून देण्यात दादांचा सिंहाचा वाटा होता. जे जे दादा करत होते ते इतरांना जमणं अशक्य आहे..कारखाना परिसरातील रस्त्याचा विकास करण्यासाठी इतर सुविधा देण्यासाठी आपले सर्वोच्च प्राधान्य असणार आहे. दादांचे स्वप्न होते प्रत्येक शेतकऱ्याने ए आय चा वापर करून ऊस उत्पादक शेतकऱ्याने त्याचे एकरी उत्पादन वाढवावे. प्रत्येकाच्या कामाकडे आमचं बारकाईने लक्ष असेल. सभासद हित डोळ्यासमोर ठेवून काम करा त्याची नोंद घेतली जाईल. आपली निष्ठा सिद्ध करण्याची आवश्यकता आहे, दादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पॅनल टू पॅनेल मतदान करा असे आवाहन त्यांनी केले.
नातं ते नातं आणि निवडणूक ती निवडणूक
कोणाच्या ही ध्यानीमनी नसताना तीन पॅनल उभा राहिलेत. त्यात आपलीच माणसं आहेत. गावकी भावकी नातेवाईक आहेत, अशा अफवा पसरवल्या जात आहेत की हे नंतर एकत्र येणार आहेत, असं अजिबात होणार नाही. नातं ते नातं आणि निवडणूक ती निवडणूक असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. शरद पवारांच्या गटासंदर्भात त्यांनी ह वक्तव्य केलं आहे. दुष्काळाचे सावट सर्वत्र पडलं आहे काही ठिकाणी पाणी असल तरी मराठवाड्यात अत्यंत बिकट स्थिती आहे, पाण्याचा साठा पिण्यासाठी सर्वांना लागणार आहे,वास्तवात जगणं आवश्यक आहे. समोरची लोक म्हणतात, ही लोक नट बोल्ट विकून खाणारे आहेत. मग तुमच्या पॅनल मध्ये निम्म्यापेक्षा जास्त लोक तिथेच आहेत मग तुम्ही कोण आहात. दादांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी माझी आहे आणि मी ती पार पडेल असा शब्द देते. दादांच्या नंतरची ही खरी पहिलीच निवडणूक आहे दादांचे प्रेम तुमच्या मतातून एक श्रद्धांजली च्या रुपात द्याल असेही त्या म्हणाल्या.