मोहिते पाटलांसाठी कही खुशी कही गम, माळशिरसमध्ये अर्जुनसिंहांचा जिल्हा परिषदेवर विजय, पण...
मतदानाच्या दिवशी अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी, मतदानाचा अधिकार नसलेल्या त्यांच्या मुलानेच ईव्हीएमचे बटन दाबल्याचे व्हिडिओत दिसून आले.

सोलापूर : राज्यातील 12 जिल्हा परिषदेच्या निवडणूक (Election) निकालाला आज सुरुवात झाली असून बहुतांश ठिकाणी भाजपचे कमळ खुलले आहे. सोलापूर (Solapur) जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी शनिवार 08 फेब्रुवारी रोजी मतदान झाले. त्यासाठी, आज निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, निकालापूर्वीच मतदानामुळे येथील जिल्हा परिषद (ZP) जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली होती. मोहिते पाटील आणि भाजप यांच्यात प्रतिष्ठेची ठरलेल्या या निवडणुकीकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं. त्यातच, मतदानादरम्यान फोंडशिरस येथे अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी मतदान करताना आपल्या मुलाला सोबत नेल्याने वाद व टीकाही करण्यात आली. याच जिल्हा परिषद गटात अर्जुनसिंह मोहिते पाटील यांना विजय मिळाला आहे.
मतदानाच्या दिवशी अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी, मतदानाचा अधिकार नसलेल्या त्यांच्या मुलानेच ईव्हीएमचे बटन दाबल्याचे व्हिडिओत दिसून आले. त्यावरुन, वाद निर्माण झाल्यानंतर उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी पोलिस कर्मचारी, मतदान केंद्राध्यक्ष यांची चूक आहे, असे सांगून संबंधित मतदार, पोलिस आणि केंद्राध्यक्षांवर कारवाई होणार असल्याचे सांगितले. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत शनिवारी दोन ते तीन ठिकाणी नियमांचे उल्लघंन झाल्याचे पुढे आले आहे. यात मोहोळमध्ये एका हॉटेलबाहेर ईव्हीएम आढळून आली आहेत. त्या प्रकरणी तिघांवर जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. झोनल अधिकारी, त्यांचे सहायक आणि वाहनचालक यांची चूक असल्याचे दिसून आले आहे.
माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस गटातून धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलत बंधू राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटील विजयी झाले आहेत. त्यामुळे, एका ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला असताना, दुसरीकडे विजयाचा गुलाल उधळण्याची संधी मोहिते पाटलांना मिळाली आहे. माळशिरस तालुक्यातील गुरसाळे गणातून अर्जुनसिंह मोहिते पाटील यांना पराभव पत्कारावा लागला. येथे भाजप उमेदवाराने विजय मिळवल्याने मोहिते पाटलांना हा मोठा धक्का मानला जातो. मात्र, अर्जुनसिंह पंचायत समितीच्या गणातून पराभूत झाले असले तरी, जिल्हा परिषद गटातून विजयी झाले आहेत.
गुरसाळे गणातून मोहिते पाटलांचा पराभव
हाय व्होल्टेज ड्रामा रंगलेल्या दहिगाव जिल्हा परिषद गटामध्ये भाजपने मारली मुसंडी मारली. आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती यांनी शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांचे पुत्र जीवन जानकर यांचा पराभव करत विजयाचा गुलाल उधळला. दहिगाव जिल्हा परिषद गटातील दोन्ही पंचायत समिती देखील भाजपने जिंकल्या आहेत. माळशिरसमधील गुरसाळे गणातून अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे. त्यामुळे, भाजपने मोहिते पाटलांच्या बालेकिल्ल्यात गुलाल उधळला.
























