Solapur ZP Election 2026: सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील बार्शी (Barshi) तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी (Zilla Parishad Election 2026) भाजपविरोधात (BJP) दोन्ही शिवसेना (Shiv Sena) एकत्र आल्याने राजकीय वातावरण तापले असतानाच, या घडामोडीवर राज्याचे मंत्री आणि भाजप नेते जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. बार्शीतील महाआघाडी ही केवळ स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी करण्यात आलेली अनैसर्गिक युती असल्याची टीका त्यांनी केली आहे.

Continues below advertisement

जयकुमार गोरे म्हणाले, “भाजप हा जिल्ह्यातला आणि राज्यातला सर्वात मोठा पक्ष आहे. अनेक पक्ष आज स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपड करत आहेत. स्वतःचे अस्तित्व वाचवण्यासाठीच युती-आघाड्या केल्या जात आहेत, यावरून भाजप किती मजबूत आहे, हेच स्पष्ट होते.”

Solapur ZP Election 2026: स्थानिक आघाड्या करताना विचार करायला हवा

बार्शीत शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट भाजपविरोधात एकत्र आल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी महायुतीतील घटक पक्षांनाही सूचक इशारा दिला. “महायुतीमधील पक्षांनी काही आचारसंहिता पाळायला हव्यात. महायुतीच्या बाहेर जाऊन स्थानिक आघाड्या करताना विचार करायला हवा. बार्शीत युती नेमकी कशी झाली आणि राऊतांना काय अधिकृत वाटतं, हे त्यांनाच विचारा,” असेही गोरे म्हणाले.

Continues below advertisement

Solapur ZP Election 2026: सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचाच अध्यक्ष होईल

विरोधकांवर निशाणा साधताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “भाजपचा पराभव एक-दोन किंवा तीन जणांनी एकत्र येऊन करणे शक्य नाही, हे विरोधकांना आता कळून चुकले आहे. त्यामुळेच आज पाच-पाच पक्ष एकत्र येताना दिसत आहेत. मात्र अशा अनैसर्गिक युती-आघाड्या जनतेला मान्य होणार नाहीत. लोकं शेवटी भाजपच्याच बाजूने उभे राहतील. आगामी सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचाच अध्यक्ष होईल,” असा दावा जयकुमार गोरे यांनी केलाय.  

Solapur ZP Election 2026: दिलीप सोपल यांनी केली महाआघाडीची घोषणा

दरम्यान, बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणूक ही नेहमीच आमदार दिलीप सोपल आणि भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत या दोन प्रमुख नेत्यांभोवती फिरताना दिसते. यंदाच्या निवडणुकीतही दिलीप सोपल यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी विरुद्ध राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखालील भाजप असा थेट सामना होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाआघाडीची घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत केली असून, आज सायंकाळी बार्शीत होणाऱ्या निर्धार मेळाव्याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Jaykumar Gore: आयाराम-गयाराम शब्दावर जयकुमार गोरे चिडले

दरम्यान,  महापौरपदासाठी आयारामांना संधी मिळणार की निष्ठावंत कार्यकर्त्यांना, असा प्रश्न विचारताच पालकमंत्री जयकुमार गोरे पत्रकारांवर चिडले. ‘आयाराम-गयाराम’ हा शब्द वापरल्याबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांनी पत्रकारांना भाषेची मर्यादा आणि साधनसुचिता पाळण्याचा सल्ला दिला. “भाजपचे सदस्यत्व स्वीकारून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या लोकांबाबत थोडं अदबीने बोललं पाहिजे. प्रत्येकवेळी अशा पद्धतीची भाषा वापरणं योग्य नाही,” असे गोरे म्हणाले. तसेच, “आपण सर्वांनी भाजप म्हणून एकत्र काम केलं पाहिजे. प्रश्न विचारताना लोकांचा सन्मान राहील, अशा शब्दांचा वापर हवा,” असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकारांना उद्देशून बोलताना गोरे म्हणाले, “तुम्हीही एका वर्तमानपत्रातून दुसऱ्या वर्तमानपत्रात काम करता, हे लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे प्रश्न विचारताना संयम आणि जबाबदारी ठेवली पाहिजे,” असे त्यांनी म्हटले.

आणखी वाचा 

राष्ट्रवादी एकत्र आली तरीही सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजपचाच झेंडा फडकणार, जयकुमार गोरेंना विश्वास, विरोधकांवर टोलेबाजी