Shubhangi Patil: गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाला मोठी गळती लागल्याचे चित्र आहे. आता उत्तर महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला एक मोठा धक्का बसला आहे. ठाकरे पक्षाच्या उत्तर महाराष्ट्राच्या उपनेत्या शुभांगी पाटील (Shubhangi Patil) आज मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात (Shiv Sena Shinde Faction) जाहीर प्रवेश करणार असल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती, तेव्हापासूनच त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर आज त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Shubhangi Patil: ठाकरे गटाच्या कार्यपद्धतीवर व्यक्त केली होती नाराजी
यापूर्वी एबीपी माझाशी बोलताना त्यांनी शिंदे गटातील प्रवेशाबाबत सावध प्रतिक्रिया दिली होती. "प्रवेशाबाबत अद्याप कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाही, तो निर्णय झाल्यावर मी स्वतः सगळ्यांना सांगेन," असे त्यांनी म्हटले होते. मात्र, या प्रसंगी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यपद्धतीवर आणि अंतर्गत राजकारणावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या नाराजीतूनच त्यांनी पक्षाला 'जय महाराष्ट्र' करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. उपमुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर त्यांचा प्रवेश निश्चित झाल्याची माहिती मिळत आहे.
Who is Shubhangi Patil: कोण आहेत शुभांगी पाटील?
शुभांगी पाटील या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या असून, त्यांच्याकडे महिला आघाडीच्या संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी देखील होती.राजकारणासोबतच त्या शैक्षणिक क्षेत्रातही सक्रिय असून, राज्य शिक्षक संघटनेच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. नाशिक पदवीधर मतदार संघाच्या अत्यंत गाजलेल्या आणि प्रतिष्ठेच्या निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून निवडणूक लढवली होती. या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत सत्यजीत तांबे यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराला टक्कर देत त्यांनी तब्बल 40 हजार मते मिळवली होती. या निवडणुकीमुळेच त्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रकाशझोतात आल्या होत्या. आता शुभांगी पाटील ठाकरेंच्या शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करणार असल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या
