Avinash Jadhav On Eknath Shinde ठाणे: ठाण्यात शिंदेच्या शिवसेनेचे 7 नगरसेवक बिनविरोध निवडून आले. यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेकडून शिंदे गटावर गंभीर आरोप केले जात आहे. यामध्ये एक पोलीस कर्मचारी आमच्या उमेदवाराला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी नेत असल्याचा आरोप मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केला आहे. तसेच याचा पुरावा म्हणून व्हिडीओही अविनाश जाधव यांनी दाखवल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Thane Municipal Corporation Election 2026)
मनसे नेते अविनाश जाधव आणि ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी (Avinash Jadhav-Rajan Vichare) पोलीस अधिकारी शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार विक्रांत घाग यांना एकनाथ शिंदेंच्या घरी घेऊन जात असल्याचा व्हिडीओ दाखवला. एकनाथ शिंदेंच्या घरी गेल्यानंतर आमच्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतला, असा आरोप अविनाश जाधव यांनी केला. तसेच पक्षासोबत जो गद्दारी करेल त्याचा पाहुणचार केला जाईल. ज्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतला, त्यांचा देखील चांगला समाचार घेणार असल्याचा इशारा अविनाश जाधव यांनी दिला. तसेच उमेदवार बिनविरोध हा एकप्रकारे मतदारांचा विश्वासघात असल्याचा आरोप राजन विचारे आणि अविनाश जाधव यांनी केला.
भ्रष्ट निवडणुक अधिकारी दोन दिवसात बदला- अविनाश जाधव (Avinash Jadhav Thane)
ठाण्यात शिंदेच्या सहा साथिदारांपैकी तीनजण वृषाली पाटील या निवडणुक अधिकाऱ्याच्या अखत्यारीतील केंद्रात बिनविरोध करण्यात आले. तर, सत्वशिला शिंदे या निवडणुक अधिकारीनेही हाच कित्ता गिरवल्याचा आरोप करीत अविनाश जाधव यांनी दोन दिवसात हे दोन्ही निवडणुक अधिकारी बदलुन नविन अधिकारी नेमावेत. अन्यथा निवडणुक कार्यालयावर मनसे स्टाईल धडक देणार असल्याचा इशारा दिला आहे. तसेच पालिका निवडणुकीत शिवसेना, मनसे पक्षाचे तिकीट घेऊन उमेदवारी मागे घेणाऱ्या गद्दारांना क्षमा नाही. पक्षाला कोणतीही पूर्वसूचना न देता माघार घेणारे सध्या गायब आहेत. निवडणुका संपताच ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली आहे, त्यांचा पाहुणचार आम्ही घेणारच, असा इशारा राजन विचारे आणि अविनाश जाधव यांनी सांगितले
बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांच्या विरोधात आज मनसे याचिका दाखल करणार- (Thane Municipal Corporation Election 2026)
बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांच्या विरोधात आज मनसे उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. या याचिकेत सर्व बिनविरोध आलेल्या नगरसेवकांच्या निकालावर स्थगिती द्यावी, अशी मागणी याचिकेतून करण्यात येणार आहे. मुख्य म्हणजे असीम सरोदे ही याचिका दाखल करणार असून ते मनसेची बाजू मांडणार आहेत. या याचिकेत सर्व बिनविरोध कसे निवडून आले, त्याची चौकशी करण्यासाठी हाय कोर्टामार्फत निवृत्त न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून चौकशी व्हावी अशी मुख्य मागणी असणार आहे. आज दाखल करण्यात येत असलेल्या याचिकेला 2024 साली सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या याचिकेचा आणि निर्णयाचा आधार आहे.