Shashikant Shinde on Ambadas Danve मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी अंबादास दानवे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार आदित्य ठाकरे यांनी अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा केली. यानंतर महाविकास आघाडीतील घटकपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस यांच्याकडून काय भूमिका घेतली जाते ते पाहावं लागणार होतं. अंबादास दानवे यांचं नाव जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून भूमिका जाहीर करण्यात आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनं घेतलेल्या निर्णयाला समर्थन असल्याचं शशिकांत शिंदे यांनी म्हटलं.
शशिकांत शिंदे काय म्हणाले?
राज्यसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला तेव्हा मविआतील पक्षांनी शरद पवार यांच्या नावाला मान्यता दिली होती. विधानपरिषदेला उद्धव ठाकरे उमेदवार असावेत असं सांगितलं होतं. अंबादास दानवेंचं नाव जाहीर केलं असेल तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र असू, असं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी म्हटलं. उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषेदत असावेत, अशी आमची मागणी होती, त्या पक्षानं कोणाला उमेदवारी द्यायची हा त्यांचा अधिकार आहे. आम्ही चर्चा करुन त्यांच्या पक्षानं घेतलेल्या निर्णयाप्रमाणं निर्णय करणार आहोत. पवारसाहेबांनी निर्णय घेतला असेल तर त्यात बदलण्याचा विषय येत नाही, असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलं. विधानपरिषद निवडणूक बिनविरोध झाली तर आनंदच आहे, असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलं.
काँग्रेसचे नेते सचिन सावंत काय म्हणाले?
विधानपरिषद निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं निर्णय घेतलेला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन काँग्रेसची भूमिका सांगितली होती. महाविकास आघाडी पक्षात तिन्ही पक्षांनी मिळून निर्णय घ्यायचा असतो. निवडणुकीला कसं सामोरं जायचं यासंदर्भात ठरवलं जाईल, असं सचिन सावंत म्हणाले. उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेत जावं ही आमची भूमिका होती, आता अंबादास दानवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, कोणाला उमेदवारी द्यायचा हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. राज्यसभा असेल, पुढची विधानपरिषद असेल त्यासंदर्भात वाटपाचा निर्णय आहे. यासंदर्भातील निर्णय आमच्या पक्षाचे अध्यक्ष आणि वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असं सचिन सावंत म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत जावं, अशी चर्चा झाली होती. उद्धव ठाकरेंनी विधानपरिषद लढावी अन्यथा काँग्रेसला विधानपरिषद द्यावी, अशी चर्चा झाली होती. आता ठाकरेंच्या शिवसेनेनं निर्णय जाहीर केलेला आहे. आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते चर्चा करतील आणि निर्णय घेतली, असं काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटलं. विधानपरिषद बिनविरोध करायची की नाही यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यायचा असल्याचं अतुल लोंढे यांनी म्हटलं.
