Sanjay Gaikwad on Shivaji Kon hota book: दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी तब्बल 37 वर्षांपूर्वी लिहलेल्या 'शिवाजी कोण होता', या पुस्तकाच्या शीर्षकाबाबत शिंदे गटाचे वादग्रस्त आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांना अचानक साक्षात्कार झाला आहे. त्यांनी या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी (Prashant Ambi) यांना फोन करुन शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj) अनादर केल्याचे म्हणत शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली. संजय गायकवाड यांच्या फोनवरील शिवराळ संभाषणाची ही ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. (Maharashtra Politics news)

अरे गोविंद पानसरे (Govind Pansare) हा छत्रपती शिवाजी महाराजांना एकेरीत शिवाजी म्हणणारा कोण होता? मला हे पुस्तक वाचायची गरज नाही. तुमच्यासारखे नालायक लोक शिवाजी महाराजांना एकेरी भाषेत बोलतात. तुला माहितीये ना, त्या गोविंद पानसरेचं काय झालं, त्याची अवस्था काय झाली? मी तुलाही घरात घुसून मारेन, तुला चिरडून टाकेन, तुझी जीभ छाटेन, अशी धमकी संजय गायकवाड यांनी प्रशांत आंबी यांना दिली.

यावेळी प्रकाश प्रशांत आबी यांनी 'शिवाजी कोण होता' हे पुस्तक मी नव्हे तर प्राध्यापक गोविंद पानसरे यांनी लिहले आहे. हे पुस्तक 1988 साली प्रकाशित झाले होते. या पुस्तकात शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नाही, तुम्ही आधी ते पुस्तक वाचा, असे संजय गायकवाड यांना सांगून पाहिले. मात्र, कायम वादग्रस्त बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या संजय गायकवाड यांनी काहीही ऐकून न घेता प्रशांत आंबी यांना शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देणे चालू ठेवले. मात्र, प्रशांत आंबी यांनीही न डगमगता संजय गायकवाड यांना, 'तुम्ही उद्या माझी जीभ कापायला या', असे ठाम उत्तर दिले. या सगळ्याविषयी संजय गायकवाड यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करुन स्पष्टीकरण दिले आहे. आमदार संजय गायकवाड यांची आजपर्यंतची कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. त्यांनी यापूर्वी आमदार निवासातील कँटिनमधील कर्मचाऱ्याला चांगले जेवण न मिळाल्यामुळे मारहाण केली होती. त्यावेळी संजय गायकवाड वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी संजय गायकवाड यांना समज दिली होती. मात्र, त्यानंतरही संजय गायकवाड यांच्या वागण्यात फारसा फरक पडलेला दिसत नाही. आज जागतिक पुस्तक दिनीच त्यांनी एका पुस्तकाच्या प्रकाशकाला धमकी देऊन नवा वाद ओढवून घेतला आहे.