BMC Election 2026 Samadhan Sarvankar: मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 194 मध्ये माझ्याविरोधात अनेकजण एकटवले होते. माझ्या प्रभागात चार-पाच आमदार, दोन पक्षप्रमुखांची मुलं प्रचार करत होते. या सगळ्यांच्य टार्गेटवर मीच होतो. तरीही मतदार माझ्यासोबत उभे राहिले. मात्र, भाजपने मदत न केल्यामुळे माझा पराभव झाला, असा आरोप शिंदेंच्या शिवसेनेचे पराभूत उमेदवार समाधान सरवणकर (Samadhan Sarvankar) यांनी केला. समाधान सरवणकर हे शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आणि सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष समाधान सरवणकर यांचे चिरंजीव आहेत. वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या महेश सावंत (Mahesh Sawant) यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांचे चिरंजीव समाधान सरवणकर आणि मुलगी प्रिया सरवणकर यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. ठाकरे गटाच्या निशिकांत शिंदे (Nishikant Shinde) यांनी सरवणकर यांचा पराभव केला होता. यानंतर समाधान सरवणकर यांनी भाजपच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. (BMC Election Results 2026)
माझ्या प्रभागात चार-पाच आमदार प्रचार करत होते. दोन पक्ष प्रमुखांची मुलं माझ्या मतदार संघात प्रचार करत होती. त्यांचं टार्गेट मी होतो, तरी मतदार माझ्यासोबत उभे राहिले. माहीम विधानसभेत मला भाजपची मदत झाली नाही. भाजपचे विशिष्ट एक पदाधिकारी होते, त्यांनी सर्वांना सांगितलं की यांना मदत करु नका. Whatsapp मेसेजवरुन सांगितले जात होते की, आपल्याला काहीतरी आलेलं आहे. त्यामुळे कोणी आम्हाला माहीममध्ये मदत केली नाही, असे समाधान सरवणकर यांनी म्हटले. WhatsApp चॅटमध्ये देखील लिहिण्यात आले होते की, आपल्याला यांचं (समाधान सरवणकर) काम करायचं नाही, आपल्याला यांचा पराभव करायचा आहे, असा दावा समाधान सरवणकर यांनी केला.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही भाजपची ही विशिष्ट टोळी महायुतीचा उमेदवार कसा पराभूत होईल, यासाठी काम करत होती. यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत या टोळीने भाजपच्या शीतल गंभीर यांचाही पराभव कस होईल, यासाठी काम केले. पण शीतल गंभीर विजयी झाल्या. तर प्रिया सरवणकर यांच्या पराभवासाठीही भाजपमधील हीच टोळी सक्रिय होती. भाजप अशा पद्धतीने काम करेल याची आम्हाला कल्पना नव्हती. भाजपमधील एक व्यक्ती शेलार साहेबांना घाणेरड्या भाषेत बोलत होती. जो पक्षाचा आदेश होता तो डावलून या टोळीने काम केलं आहे. यासाठी आम्ही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. पक्षाचा लेबल असल्याने त्या व्यक्तीचं ऐकलं जातंय, पण त्यांनी निवडणुकीत आम्हाला मदत केली नाही. या व्यक्तीबदल आम्ही कळवायच्या अगोदर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वरिष्ठांना कळवले होते, असेही समाधान सरवणकर यांनी सांगितले.
आणखी वाचा
