Shivsena Opration Tiger Eknath Shinde-Uddhav Thackeray: ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज (18 जून) संसदीय दलाची बैठक बोलावण्यात आली होती. ठाकरेंच्या शिवसेनेकडून सर्व खासदारांना व्हीप जारी करण्यात आला होता. या बैठकीकडे खासदारांच्या एकनिष्ठतेची लिटमस टेस्ट म्हणून बघितले जात होते. परंतु या बैठकीसाठी लोकसभेचे एकूण 9 पैकी 3 खासदार उपस्थित राहिले. ऑपरेशन टायगरमधील (Opration Tiger) चर्चेत असणारे 6 खासदार गैरहजर राहिल्याने एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचं शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे आता शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून अनुपस्थित राहिलेल्या 6 खासदारांवर कारवाई करण्याची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी आपल्यासोबत असलेल्या 4 खासदारासोबत चर्चा केली. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. लोकसभा अध्यक्ष यांना पुन्हा एक पत्र लिहून 6 खासादारंनी व्हीपचं उल्लंघन केल्याची माहिती देणार अशी सूत्रांची माहिती आहे. (Shivsena Opration Tiger Eknath Shinde-Uddhav Thackeray)

Continues below advertisement

शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदेंच्या गळाला लागले आहेत. या 6 खासदारांनी वेगळा गटही स्थापन केला आहे आणि तसं पत्र लोकसभा अध्यक्षांना दिल्याची माहिती आहे. ऑपरेशन टायगर (फुलप्रूफ झालेले असून आता लगेच काहीही जाहीर करायचे नाही, कोणतेही पुरावे द्यायचे नाही असं शिंदे शिवसेनेकडून ठरवण्यात आल्याचं कळतंय. ठाकरे गटाचे कायदेशीर डावपेच बघूनच पुढील पावलं टाकली जातील. पुढील 2 दिवस तरी अधिकृतरित्या काहीही समोर आणलं जाणार नाही, अशी माहिती शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांनी माझाला दिली आहे. अतिशय काटेकोरपणे आणि नियोजन पद्धतीनं ऑपरेशन टायगर राबवलं गेल्याची माहिती हळूहळू समोर येत आहे. रात्रभरात दिल्लीत वायूवेगानं घडामोडी घडत गेल्या. दरम्यान खासदारांचा स्वतंत्र गट लवकरच शिवसेनेत विलीन करण्यात येणार असून शिंदेंचे 6 खासदार लवकरच शिवसेनेत प्रवेश करुन आपली बाजू मांडतील, असं सांगण्यात येत आहे.

ठाकरे गटाकडून तातडीने नोटीस पाठवण्याची प्रक्रिया सुरू- (Shivsena Opration Tiger)

बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या खासदारांना आजच नोटीस पाठवली जाणार आहे. ठाकरे गटाकडून तातडीने नोटीस पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नोटीसवर प्रत्येक खासदारांकडून उत्तर मागितलं जाणार आहे. नोटीसला उत्तर देण्यासाठी केवळ काही तासांचाच वेळ दिला जाईल. दिलेल्या वेळेत उत्तर आलं नाही, तर मग पुढे कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. कारवाई करण्याचे अधिकार लोकसभा अध्यक्ष यांच्याकडे असणार आहेत. सोबतच नव्या गटाला मान्यता देण्याचे अधिकार देखील लोकसभा अध्यक्ष यांच्याकडेच राहतील. शिवसेना दोन्ही गटांची पुढची लढाई आता लोकसभा अध्यक्षांच्या दारात जाईल. लोकसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार, याकडे आता पुढचं लक्ष असेल. 

Continues below advertisement

खासदारांच्या फुटीर गटाचं नेतृत्व संजय जाधव यांच्याकडे दिले जाणार- (Shivsena Opration Tiger)

ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरेंची साथ सोडण्याच्या तयारीत असलेल्या खासदार यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षा वाढवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. या घटनेचे पडसाद राज्यात उमटू शकतात, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता कुठलाही अनिश्चित प्रकार घडू नये या अनुषंगाने स्थानिक पोलिसांकडून खासदारांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांनीही काल झालेल्या पत्रकार परिषदेत अनुपस्थित खासदारांना इशारा दिला होता. त्यानूसार खबरदारी म्हणून पोलिसांकडून संबंधित खासदार यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवल्याचे कळते. मुंबईतील खासदार संजय दिना पाटील यांच्या घराबाहेरही मोठा पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे दरम्यान नाॅटरिचेबल असलेल्या खासदारांचा वेगळा गट होत असताना. या गटाचं नेतृत्व संजय जाधव यांच्याकडे दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

6 खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ का सोडली? (Why did 6 MPs part ways with Uddhav Thackeray Shivsena?)

पक्ष सोडण्यापूर्वी बंडखोर खासदारांनी मंजूर केलेल्या ठरावात, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे काँग्रेसमध्ये संभाव्य विलीनीकरण होण्याबाबतच्या भीतीचा उल्लेख करण्यात आला आहे. या ठरावात म्हटले आहे की, पक्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीपासून भरकटला आहे आणि काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या उद्देशाने शिवसेनेची स्थापना करण्यात आली नव्हती. तसेच, तृणमूल काँग्रेसने काँग्रेसमध्ये विलीन व्हावे, असा सल्ला संजय राऊत यांनी दिल्याचा संदर्भ देत, भविष्यात 'शिवसेना ठाकरे गट देखील काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकते, अशी भीती या ठरावात व्यक्त करण्यात आली होती. परिणामी, पक्ष नेतृत्वावरील अविश्वासामुळे बंडखोर खासदारांनी वेगळी वाट धरण्याचा निर्णय जाहीर केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, बंडखोर खासदारांनी स्वतःला स्वतंत्र गट म्हणून घोषित केलेले नाही; त्यांनी मंजूर केलेल्या ठरावानुसार, त्यांनी थेट शिवसेनेत विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, प्रसारमाध्यमांच्या वृत्तांमध्ये त्यांना 'स्वतंत्र गट' असे संबोधले जात असले तरी, फुटलेल्या खासदारांनी त्यांच्या ठरावात असा दावा करण्यात आला आहे की, ते शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन झाले आहेत.

कोणाकोणाला ठाकरे गटाकडून नोटीस पाठवली जाणार? (Shivsena Opration Tiger)

  1. संजय देशमुख – यवतमाळ-वाशिम
  2. संजय दिना पाटील – ईशान्य मुंबई 
  3. संजय जाधव – परभणी
  4. नागेश पाटील आष्टीकर – हिंगोली
  5. भाऊसाहेब वाकचौरे – शिर्डी
  6. ओमराजे निंबाळकर - धाराशिव

बंडखोर खासदारांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला- (Shivsena Operation Tiger)

ठाकरे गटातील'ऑपरेशन टायगर' प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची साथ सोडणाऱ्या खासदारांच्या घराबाहेर पोलीस सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या घडामोडींचे राज्यभर पडसाद उमटण्याची शक्यता लक्षात घेऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संजय राऊत यांनी कालच्या पत्रकार परिषदेत अनुपस्थित खासदारांना इशारा दिल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आल्याचे समजते.

एकनाथ शिंदेंचा ठाकरेंच्या 6 खासदारांशी कॉन्फरन्स कॉल- (Shivsena Opration Tiger Eknath Shinde)

शिवसेनेच्या सर्व सहा खासदारांचा रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांच्यासोबत कॉन्फरन्स कॉलवर बोलणं झाल्याची सूत्रांची माहीती आहे. एकनाथ शिंदेंनी सर्व सहा खासदारांसोबत 30 मिनिटं सविस्तर चर्चा केली. संभ्रम असलेले उबाठाचे दोन खासदार ओमराजे निंबाळकर आणि संजय दीना पाटीलही कॉनकॉलमधे असल्याची सूत्रांची माहिती आहे. ऑपरेशन टायगर यशस्वीरित्या पार पडलंय, शिवसेना सर्व खासदरांच्या पाठिशी खंभीर उभी राहणार, असं एनकाथ शिंदेंकडून यावेळी आश्वासन देण्यात आलं. त्यामुळे ठाकरेंचे सहा खासदार आज संसदीय बोर्डाच्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची शिवसेना सूत्रांची माहीती आहे. हे सर्व ऑपरेशन गोपनिय पद्धतीने राबवण्याची दिल्लीत श्रीकांत शिंदे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. ऑपरेशन यशस्वी करण्यासाठी श्रीकांत शिंदे दिल्लीत ठाण मांडून आहेत. 

'उबाठा'च्या 6 खासदारांवर अपात्रतेची कारवाई होणार? ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांचे कायदेशीर विश्लेषण (Ujjwal Nikam On Opration Tiger)

उबाठाच्या सहा खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे काय मागणी केली आहे? त्यांनी आपला नेता निवडला आहे का? लोकसभा अध्यक्षांनी त्यांना मान्यता दिली आहे का? त्यांनी काही वेगळा व्हिप काढलेला आहे का? या सर्वांचे उत्तर मिळाल्याशिवाय ठाकरे गटाच्या व्हिपला किती महत्त्व आहे याबाबत स्पष्टपणे सांगता येणार नाही. शिवसेना उबाठाच्या सहा खासदारांनी व्हिप निघायच्या अगोदरच लोकसभा अध्यक्षांना भेटून आमच्या गटाला स्वतंत्रपणे बसण्याची परवानगी द्यावी तसेच आम्हाला देखील व्हिप काढण्याचा अधिकार द्यावा, अशी मागणी केली असेल तर व्हिप नेमका कोणाचा लागू व्हावा? यावर रणकंदन होऊ शकते. कोणताही पक्ष असू द्या, त्या पक्षातर्फे व्हिप काढला जातो, तो व्हिप बंधनकारक असतो. उबाठा पक्षाने काढलेल्या व्हिपला नक्कीच कायदेशीर महत्त्व आहे. पण, या सहा खासदारांनी नेमकी काय खेळी खेळली आहे? हे बघणे देखील रंजक ठरणार आहे. 

दिल्लीत शिवसेना ठाकरे गटाच्या संसदीय बैठकीत कोणकोण पोहोचले? (Shivsena Opration Tiger)

1. संजय राऊत (राज्यसभा)

2. अरविंद सावंत (लोकसभा)

3. अनिल देसाई (लोकसभा)

4. राजाभाऊ वाजे (लोकसभा)

ठाकरेंचे कोणकोणते खासदार बैठकीत गैरहजर- (Shivsena Opration Tiger)

1. संजय जाधव

2. संजय देशमुख

3. नागेश पाटील आष्टीकर

4. ओमराजे निंबाळकर

5. भाऊसाहेब वाकचौरे

6. संजय दिना पाटील

ठाकरेंच्या 'व्हीप'वर सुप्रीम कोर्ट काय म्हणालंय? (Shivsena Opration Tiger)

  • व्हीप हा विश्वासदर्शक किंवा अविश्वास ठरावासाठीच बजावता येतो.
  • व्हीप हा आमदार,खासदाराच्या सभागृहातील वर्तनाशी निगडीत.
  • 1992 च्या किहोतो-झचिल्लु खटल्यानुसार पक्षांतर्गत बैठकीसाठी व्हीप लागू होत नाही.
  • खासदाराने पक्षत्याग केल्यास तो अपात्र ठरतो.
  • खासदार व्हीपविरोधात मतदान केल्यास अपात्र ठरतो.
  • व्हीप बजावूनही खासदार मतदानावेळी तटस्थ राहिल्यास अपात्र ठरतो.
  • खासदाराने पक्षाची बैठक टाळल्यास हकालपट्टीसारखी कारवाई शक्य,पण अपात्र ठरवता येत नाही.

'ऑपरेशन टायगर'ची टाईमलाइन- (Shivsena Opration Tiger)

  • 10 जून- एनडीच्या बैठकीदरम्यान अमित शाह, शिंदेंमध्ये ऑपरेशन टायगरबाबत चर्चा
  • अमित शाहांनी मोदींशी चर्चा करून संमती मिळवली
  • 10 जून- शाह यांची फडणवीस, शिंदेंसोबत बैठक आणि ग्रीन सिग्नल
  • 10 जून- दिल्लीतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठाकरेंच्या खासदारांची शिंदेंसोबत भेट
  • 14 जून- उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली
  • अनिल देसाई, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे बैठकीला हजर
  • नागेश आष्टीकर, संजय देशमुख ऑनलाईन उपस्थित 
  • ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय जाधव गैरहजर 
  • 15 जून- खासदार संजय देशमुखांची दिल्लीत प्रतापराव जाधवांशी भेट 
  • 16 जून- रात्री ठाकरेंचे 6 खासदार दिल्लीत गेल्याच्या बातम्या, शिंदेही रवाना
  • फुटीर गटाला मान्यता देऊ नका, अरविंद सावतांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र 
  • 17 जून- संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजेंची पत्रकार परिषद 
  • ठाकरेंच्या 6 खासदारांचा स्वतंत्र गट स्थापन, लोकसभा अध्यक्षांना पत्र 
  • ठाकरेंकडून सर्व खासदारांना 18 जूनच्या संसदीय पक्ष बैठकीसाठी व्हीप 

संबंधित बातमी:

Shivsena Opration Tiger Eknath Shinde Uddhav Thackeray: एकनाथ शिंदेंनी ओमराजे निंबाळकर, संजय दीना पाटीलसह 6 खासदारांना एकत्र कॉलवर घेतलं; ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचं सांगत म्हणाले...