मुंबई : उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या खासदाराने दिल्लीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्याची भेट घेतल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्याचं दिसून आलं. यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतली. परंतु या भेटीमागची कल्पना आपण उद्धव ठाकरेंना दिल्याची माहिती संजय देशमुखांनी दिली.
राज्यात सुरू असलेल्या 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या बैठकीला 9 पैकी केवळ 4 खासदार उपस्थित राहिल्याचं समोर आलं. त्यानंतर वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. अनुपस्थित राहिलेले खासदार शिंदेंच्या शिवसेनेच्या जवळ जात असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या. त्याचवेळी खासदार संजय देशमुखांनी दुसऱ्याच दिवशी शिंदेंच्या मंत्र्याची भेट घेतल्याने या खासदारांच्या भूमिकेविषयी संभ्रम सुरू झाला.
मतदारसंघातील कामासाठी भेट घेतल्याचा दावा
ठाकरेंचे खासदार संजय देशमुख यांनी मंत्री प्रतापराव जाधवांची भेट घेतली. या भेटीबाबत संजय देशमुखांनी स्पष्टीकरण दिलं आहे. संजय देशमुखांनी उद्धव ठाकरेंना फोन करून भेटीमागचं कारण सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मतदारसंघातील महाविद्यालयाच्या परवानगीच्या कामानिमित्त मंत्री प्रतापराव जाधवांची भेटी घेतल्याचं उद्धव ठाकरेंना सांगितल्याचं संजय देशमुख म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी रविवारी मातोश्रीवर बोलावलेल्या बैठकीला ऑनलाईन उपस्थित असलेल्या संजय देशमुखांनी मंत्री प्रतापराव जाधवांची भेट घेतल्याने काहीसा संभ्रम निर्माण झाला होता. हा संभ्रम दूर करण्यासाठी संजय देशमुखांनी उद्धव ठाकरेना संपर्क साधून आपली भेट महाविद्यालयाच्या परवानगीच्या कामानिमित्त होती असं स्पष्टीकरण दिलं आहे.
पाच खासदार अनुपस्थित
शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाकरेंचे खासदार फोडण्यासाठी 'ऑपरेशन टायगर' राबवले जात असल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशातच रविवारी मातोश्रीवर पार पडलेल्या बैठकीमुळे उद्धव ठाकरे आणि नऊपैकी पाच खासदारांमध्ये दुरावा वाढतोय का? असा सवाल उपस्थित होत आहे.
रविवारी आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसाला गैरहजर राहिलेले संजय जाधव, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि नागेश पाटील आष्टीकर, मातोश्रीवर पार पडलेल्या बैठकीलाही गैरहजर होते. याविषयी जेव्हा संजय राऊतांना विचारणा झाली, तेव्हा त्यांनी पाच खासदार ऑनलाईन उपस्थित असल्याचं सांगितलं. प्रत्यक्षात मात्र केवळ नागेश आष्टीकरांशीच उद्धव ठाकरेंची ऑनलाईन चर्चा झाल्याचं समोर आलं. इतर खासदारांनी उद्धव ठाकरेंशी चर्चाच केली नसल्याचं सांगण्यात येत आहे.
कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम राहू नये, यासाठी आपण का आला नाहीत? याचे स्पष्टीकरण द्यावे अशा सूचना उद्धव ठाकरेंनी अनुपस्थित खासदारांना दिल्या होत्या. त्यामुळे त्या पाच खासदारांनी त्याबाबत स्पष्टीकरण दिलं खरं.. पण आता दोन दिवसांनी उद्धव ठाकरेंनी पुन्हा बोलावलेल्या बैठकीला ते खासदार जाणार का? की दुरावा कायम राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ही बातमी वाचा:
