Sanjay Gaikwad Shivaji Kon Hota: कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित 'शिवाजी कोण होता' या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकावल्याप्रकरणी आणि शिवीगाळ करणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना न्यायालयाने झटका दिला आहे. न्यायालयाकडून आमदार असलेल्या संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांच्या पोलीस चौकशीला परवानगी देण्यात आली आहे. प्रशांत आंबी यांनी कोल्हापूरमधील (Kolhapur News) राजारामपुरी पोलीस ठाण्यात संजय गायकवाड यांच्याविरोधात तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी त्यावेळी संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा नोंदवण्यास नकार दिला होता. मात्र, आता न्यायालयाने आमदार संजय गायकवाड यांच्या चौकशीची परवानगी दिल्याने याप्रकरणात पुढील कारवाईची आणि गुन्हा नोंदवण्याची वाट मोकळी होऊ शकते. दरम्यान, प्रकाशक प्रशांत आंबी (Prashant Ambi) यांना अद्यापही आमदार संजय गायकवाड यांच्या समर्थकांकडून धमक्यांचे फोन सुरुच आहेत. गेल्या महिन्याभरात शंभरहून अधिक धमक्यांचे फोन आले असून आपण याबाबत पोलिसांकडे नव्यान तक्रार देणार असल्याचे प्रशांत आंबी यांनी म्हटले. (Shivaji Kon hota book controversy )
काही दिवसांपूर्वी आमदार संजय गायकवाड यांना गोविंद पानसरे यांनी तब्बल 37 वर्षांपूर्वी लिहिलेल्या 'शिवाजी कोण होता?' (Shivaji Kon Hota) या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी असल्याचा साक्षात्कार झाला होता. त्यानंतर संजय गायकवाड यांनी प्रशांत आंबी यांना फोन करुन प्रचंड शिवीगाळ केली होती. तसेच पुस्तकाची छपाई केल्यास घरी येऊन मारेन, अशी धमकीही दिली होती. संजय गायकवाड यांच्या फोन संभाषणाची क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रचंड गदारोळ झाला होता. या फोन संभाषणात संजय गायकवाड यांनी दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्याविषयीही एकेरी आणि आक्षेपार्ह भाषा वापरली होती. याविरोधात प्रशांत आंबी यांनी ठामपणे उभे राहत संजय गायकवाड यांना प्रतिआव्हान दिले होते. प्रशांत आंबी यांनी बुलढाण्यात संजय गायकवाड यांच्या घरासमोर जाऊन आंदोलन करण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते.
या सगळ्यानंतर आता कोल्हापूर सत्र न्यायालयाने आमदार संजय गायकवाड यांच्या चौकशीला परवानगी दिल्याने हे प्रकरण पुन्हा एकदा जिवंत झाले आहे. आमदाराची चौकशी करायची असेल तर पोलिसांना न्यायालयाकडून परवानगी घ्यावी लागते. राजारामपुरी पोलिसांनी तशी परवानगी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून घेतली आहे. त्यामुळे आता संजय गायकवाड यांच्या चौकशीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी कदाचित संजय गायकवाड यांना कोल्हापूरमधील राजारामपुरी पोलीस ठाण्यात यावे लागेल. राजारामपुरी पोलीस संजय गायकवाड यांना नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलवू शकतात किंवा त्यांना त्यांचं म्हणणं लेखी स्वरुपात मांडण्याची संधी दिली जाऊ शकते. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Shivaji Kon Hota Book: नेमकं काय घडलं होतं?
संजय गायकवाड यांच्या फोनवरील शिवराळ संभाषणाची ही ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. "अरे गोविंद पानसरे (Govind Pansare) हा छत्रपती शिवाजी महाराजांना एकेरीत शिवाजी म्हणणारा कोण होता? मला हे पुस्तक वाचायची गरज नाही. तुमच्यासारखे नालायक लोक शिवाजी महाराजांना एकेरी भाषेत बोलतात. तुला माहितीये ना, त्या गोविंद पानसरेचं काय झालं, त्याची अवस्था काय झाली? मी तुलाही घरात घुसून मारेन, तुला चिरडून टाकेन, तुझी जीभ छाटेन", अशी धमकी संजय गायकवाड यांनी प्रशांत आंबी यांना दिली.
यावेळी प्रकाश प्रशांत आबी यांनी, "शिवाजी कोण होता' हे पुस्तक मी नव्हे तर प्राध्यापक गोविंद पानसरे यांनी लिहले आहे. हे पुस्तक 1988 साली प्रकाशित झाले होते. या पुस्तकात शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नाही, तुम्ही आधी ते पुस्तक वाचा", असे संजय गायकवाड यांना सांगून पाहिले. मात्र, कायम वादग्रस्त बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या संजय गायकवाड यांनी काहीही ऐकून न घेता प्रशांत आंबी यांना शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देणे चालू ठेवले. मात्र, प्रशांत आंबी यांनीही न डगमगता संजय गायकवाड यांना, 'तुम्ही उद्या माझी जीभ कापायला या', असे ठाम उत्तर दिले. या सगळ्याविषयी संजय गायकवाड यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करुन स्पष्टीकरण दिले आहे.
आणखी वाचा
