पुणे : भाजपने विधानपरिषदेसाठी (Vidhanparishad) आपल्या तीन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्यामध्ये, पुणे पदवीधर मतदारसंघासाठी स्मिता जाधव यांना उमेदवारी देण्यात आली. तर, पुणे शिक्षक मतदारसंघासाठी भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवार घोषित केलं आहे. विशेष म्हणजे, आज भाजपा (BJP) प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत दोन्ही उमदेवारांचा अर्जही भरण्यात आला. मात्र, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या जागेवर महायुतीमधील मतभेद समोर आले आहेत. कारण, येथील जागेसाठी शिवसेनेकडून (Shivsena) मंगेश चिवटे यांचं नाव आघाडीवर होतं. त्यामुळे, आता शिवसेनेकडून बंडखोरी करत मंगेश चिवटेंचा अर्जही भरला जाणार आहे. 

Continues below advertisement

शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे स्वीय सहायक असलेल्या मंगेश चिवटेंचा उद्या 6 ऑक्टोबर रोजी उमदेवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. तर, मंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहायक सचिन सानप हेही उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. मात्र, हे दोन्ही उमेदवार पुढे आपल्याला पाठिंबा देतील, असा विश्वास भाजप महायुतीचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी व्यक्त केला आहे. 

मंगेश चिवटे आणि सचिन सानप आमचे चांगले मित्र आहेत. महायुती सरकारमध्ये खांद्याला खांदा लावून काम केलं आहे, मला महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांवर विश्वास आहे, पुढे ते मला पाठिंबा देतील, असा मला विश्वास भाजप महायुतीच्या पुणे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी म्हटलं. मी स्वतः शिक्षक आहे. 2019 पासून स्वामी विवेकानंद संस्थेमध्ये शिक्षक म्हणून काम केलं आहे, अशी माहिती देखील त्यांनी दिली. 

Continues below advertisement

स्वामी विवेकानंद संस्थेच्या माध्यमातून 12 जिल्ह्यांमध्ये प्रचार केला. मोठ्या प्रमाणात बहुजन समाजातील शिक्षकांना उभं केलं आणि त्यांचा वारसा मी पुढे नेत आहे. 2005 सालापासून शिक्षकांचे जुने अनुदान, TET प्रवेश आणि असे अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न महायुतीच्या माध्यमातून सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. शिक्षक मतदारसंघातून ज्या विद्यमान आमदारांनी प्रश्न मांडणं गरजेचं होतं, त्यांनी ते मांडले नाहीत. मात्र, मी पुढे हे प्रश्न मांडून शिक्षकांना न्याय देईन. मी पाच जिल्ह्यांमध्ये फिरत आहे. मोठ्या प्रमाणात शिक्षकांमध्ये नाराजी आहे, विद्यमान आमदारांनी शिक्षकांशी संपर्क ठेवला नाही. शिक्षकांना न्याय मिळण्याची अपेक्षा होती, मात्र ती त्यांनी पूर्ण केली नाही. मला विश्वास आहे की, माझा प्रचार करून सर्व शिक्षक मला विजयी करतील, असेही त्यांनी म्हटले. 

हेही वाचा

16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती