Medha Pansare and Sanjay Gaikwad: 'शिवाजी कोण होता' या पुस्तकाच्या शीर्षकावरुन अकलेचे तारे तोडणारे आणि प्रकाशकाला शिवराळ भाषेत धमकी देणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांना कॉम्रेड गोविंद पानसरे यांची सून मेधा पानसरे (Medha Pansare) यांनी सौम्य पण सडेतोड भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे (Govind Pansare) यांचे विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहेत. त्यांचा विचार तुम्हाला मारता येत नाही. त्यांच्या विचारसरणीचा प्रतिवाद करणारा दुसरा तुल्यबल विचारच तुमच्यापाशी नाही, असे खडे बोल मेधा पानसरे यांनी आमदार गायकवाड यांना सुनावले. त्या गुरुवारी कोल्हापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. (Maharashtra Politics news)
आमदार संजय गायकवाड यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्याविषयी ज्या पद्धतीची भाषा वापरली आहे, त्याचा मी तीव्र निषेध करते. छत्रपती शिवाजी महाराज हे सौजन्यशील, न्यायप्रिय आणि गोरगरीबांचा, रयतेचा राजा म्हणून ओळखले जातात. त्यांचा वारसा सांगत आणि नाव घेत या पद्धतीची भाषा करणारे नक्की शिवरायांचा कोणता वारसा पुढे नेत आहेत? मी याचा निषेध करते, असे मेधा पानसरे यांनी म्हटले.
कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे 'शिवाजी कोण होता', हे पुस्तक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. या पुस्तकाच्या लाखो प्रती छापल्या गेल्या आहेत, वाटल्या गेल्या आहेत. हे पुस्तक आजही वाचलं जातंय. कॉम्रेड पानसरे यांनी जो विचार सांगितला आहे तो मारता येत नाही, त्यावर दुसरा तुल्यबल विचार त्यांच्यापाशी नाही. त्यामुळे अशा पद्धतीचा विचार केला जात आहे. संजय गायकवाड यांनी हे पुस्तक वाचलंय, असे मला वाटत नाही. त्यांनी केवळ पुस्तकाचे शीर्षक बघून हे वक्तव्य केल्याचे दिसत आहे. त्यांनी हे पुस्तक वाचावे, हे आवाहन आहे. पुस्तकात कोणत्या प्रकारचे छत्रपती शिवाजी महाराज सांगितले आहेत, हे त्यांनी बघावे, तपासून घ्यावे, मग स्वत:चे वक्तव्य करावे, असे मेधा पानसरे यांनी म्हटले.
Govind Pansare news: कॉम्रेड गोविंद पानसरेंना अनेक धमक्या आल्या पण त्यांनी पुस्तकाचं शीर्षक बदललं नाही: मेधा पानसरे
कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे 'शिवाजी कोण होता' हे पुस्तक ऐंशीच्या दशकात प्रकाशात झाले. त्यांच्या पुस्तकाच्या शीर्षकाबद्दलचा वाद नवीन नाही. कॉम्रेड पानसरे यांनी त्याला समर्पक उत्तर दिले आहे. त्यावेळी त्यांना अनेक धमक्या आल्या,पण त्यांनी पुस्तकाचे नाव मागे घेतले नाही. मात्र, शिवरायांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांकडून अशी भाषा केली जाते. आम्ही कॉम्रेड पानसरे यांचे विचार इतरांना समजून घेता यावेत, यासाठी पुस्तकाच्या आणखी प्रती छापू. संजय गायकवाड यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, आम्ही वकिलांचा सल्ला घेत आहोत, असे मेधा पानसरे यांनी म्हटले.
आणखी वाचा
