मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) जोरदार हल्लाबोल केला. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार (Bangladesh Crisis) होत आहेत. यावर सरकारची काय भूमिका आहे, हे सरकारनं स्पष्ट करावं अशी मागणी ठाकरेंनी केली. जसं आपण एका फोनवर युक्रेनचं युद्ध थांबवलं होतं तसंच बांगलादेशात जे काही हिंदूंवर अत्याचार होत आहेत त्याबद्दल भूमिका घ्यायला पाहिजे, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले. आता यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.
संजय शिरसाट म्हणाले की, आज उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली, ती मी पाहिली. माझी अपेक्षा होती की, देशात सुरु असणाऱ्या घडामोडी असतील, मुंबईतील घडामोडी असतील, त्यावर उद्धव ठाकरे बोलतील, असं वाटलं होतं. त्यांचा जोश मला दिसला नाही. त्यांची गल्लत आणि गफलत दिसली. त्यांची प्रेस नव्हती तर मी हिंदुत्वाचा मुद्दा घेतोय हे दाखवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांचा होता. लोकसभेला जो मुस्लिम लोकांचा फायदा झाला होता, तो फायदा विधानसभेला होईल, असं वाटलं होतं, पण ते झालं नाही. बांगलादेशमध्ये जे घडतंय त्यावर मोदी सरकार भूमिका घेतंय. लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे फडकवले होते, त्याचे उत्तर उद्धव ठाकरेंनी दिले पाहिजे. ते जो पॅटर्न आणतायत, तो आता यशस्वी होणार नाही, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले आहे.
ठाकरेंना आता 'एकला चलो रे'चा नारा द्यावा लागणार
दादर स्टेशनला लागून असलेल्या हनुमान मंदिराच्या विश्वस्तांना मंदिर हटवण्यासंदर्भात नोटीस पाठवण्यात आली आहे. यावरून उद्धव ठाकरे यांनी दादरमधील हनुमान मंदिर पाडायला निघाले आहेत. तुमचं हिंदुत्व काय कामाचं? असे म्हणत सरकारवर निशाणा साधला. यावर संजय शिरसाट म्हणाले की, दादर येथे पाठवलेल्या नोटीसीवर त्यांना पत्रकार परिषद घ्यावी लागतेय, याचे दुर्दैव आहे. शिवसेना प्रमुखांनी ज्यांना लाथ मारली, त्यांच्यासोबत ते बसलेले आहेत. त्यांना आता तुमची गरज नाही. त्यामुळे ते आता हिंदुत्वाचा मुद्दा घेत आहेत. आता उद्धव ठाकरेंना दुसरा पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे त्यांना आता आगामी निवडणुकीत 'एकला चलो रे'चा नारा द्यावा लागेल, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली आहे.
शिरसाटांचा राऊतांना टोला
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गट पुन्हा एकत्र आले पाहिजेत, असे मत व्यक्त केले. याबाबत विचारले असता संजय शिरसाट म्हणाले की, अजित पवार यांनी नातं जपण्याच काम केलेलं आहे. दोघे एकत्र आले तर काय घडेल हे शरद पवार आणि अजित पवारच जास्त सांगू शकतील. सर्व जण सांगतायत की हे दोघे एकत्र आलेच पाहिजे. पण, त्यावर आम्ही टीका करणार नाही, असे त्यांनी म्हटले. तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं की नाही ते संजय राऊत ठरवतात. राजकारणात नाती एकत्र येऊ नये, हे संजय राऊत ठरवतात, असे म्हणत संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.
आणखी वाचा
Navneet Rana : जनाब उद्धव ठाकरे, मोदीजींवर बोलायची तुमची लायकी नाही; नवनीत राणांचा घणाघात