Shinde Group MLA Fight : मोठी बातमी! दादा भुसे आणि महेंद्र थोरवेंची एकमेकांना धक्काबुक्की, शंभूराज देसाईंची मध्यस्थी, शिंदे गटाच्या आमदारांमध्ये राडा
Shinde Group MLA Fight : विधीमंडळाच्या लॉबीत शिंदे गटाच्या आमदारांमध्ये राडा पाहायला मिळाला. मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यात धक्काबुक्की झाली आहे.
Maharashtra News : विधीमंडळाच्या लॉबीत शिंदे गटाच्या आमदारांमध्ये राडा (Shinde Group MLA Fight) झाल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde Group) मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि आमदार (MLA) महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांनी एकमेंकांना धक्काबुक्की केली. विधीमंडळाच्या लॉबीमध्येच हा राडा झाला. यानंतर शंभुराज देसाई आणि भरत गोगावले यांना यामध्ये मध्यस्थी करावी लागली.
नेमकं काय घडलं?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहामध्ये आले होते, त्यावेळी शिवसेना प्रवक्ते भरत गोगावले आणि इतर शिंदे गटातले आमदार त्यांच्यासोबत होते. त्यानंतर मुख्यमंत्री सभागृहामध्ये गेले, त्यावेळी लॉबीमध्ये महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांच्यामध्येही धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे. कोणत्या कारणावरून हा वाद झाला हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र ज्या पद्धतीचा वाद या एकाच पक्षातील दोन नेत्यांमध्ये झाल्याचं समोर आलेलं आहे, यावरुन राजकीय वर्तुळात पक्षांतर्गत कलहाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
आमदारांमध्ये अशा पद्धतीची धक्काबुक्की होणं आणि तेही एकाच पक्षातल्या आमदारांमध्ये होणं, हे खरंतर महायुची सरकारमधली अशी एक पहिलीच आणि एक मोठी घटना आहे. या घटनेच्या अनुषंगानं जर आपण पाहायला गेलं, तर मागच्या अनेक दिवसांपासून ज्या पद्धतीनं वेगवेगळे वाद, या सर्व आमदारांमध्ये होताना पाहायला मिळत आहेत, त्यावरुन पक्षांतर्गत कलह तर नाही ना, असा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे. मात्र ही जी वादावादी आहे, ती लॉबीमध्ये पार पडली आणि त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असणारे भरत गोगावले आणि मंत्री शंभूराजे देसाई यांनी मध्यस्थी करत महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांना थांबण्याचा प्रयत्न केला.
विधीमंडळाच्या लॉबीतच हा वाद झाल्याचं पाहायला मिळाल्यानं आता सभागृहामध्ये सत्ताधारी पक्षांमधले आमदारांमध्ये वादावादी पाहायला मिळाली. आता विरोधक या सगळ्या विषयांवरून राजकारण करताना आपल्याला पाहायला मिळतील, गोंधळ घालताना पाहायला मिळतील. आमदारांमध्ये समन्वय नाहीये, आमदारांमध्ये वादावादी होत आहे. पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार होतोय, अशा पद्धतीनं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि तो थेट आता विधानभवनाच्या सभागृहामध्ये पाहायला मिळाल्यानं अनेक चर्चांना उधाण आलं आहे. राज्याच्या राजकारणाचा गाडा ज्या विधीमंडळातून हाकला जातो, तिथेच जनतेचं प्रतिनिधीत्व करणारे दोन सत्ताधारी पक्षाचे आमदार भिडल्यानं आता राज्याच्या राजकारणात नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्नही सर्वसामान्य जनतेच्या मनात उपस्थित झाला आहे.
महायुती सरकारमध्ये तीन पक्ष एकत्र पुढे जात आहेत. त्यामुळे एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करणं किंवा धुसफूस दोन पक्षातल्या आमदारांमध्ये होणं, आजवर आपण पाहिलं, पण एकाच पक्षातले आमदार आणि त्यातही मंत्रीसुद्धा या वादामध्ये सहभागी होतात. ही घटना अत्यंत गंभीर आहे. या घटनेच्या अनुषंगानं राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सत्ताधारी पक्षावर अनेक वेळा आरोप होत असतात, गंभीर स्वरूपाचे आरोप होत असतात. यामध्ये काही दिवसांपूर्वी या पद्धतीने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न संदर्भामध्ये विरोधकांनी प्रश्न निर्माण केले आहेत. खरं तर आजच कायदा आणि सुव्यवस्थे संदर्भात सत्ताधारी पक्ष उत्तर देणार आहेत. पण सत्ताधाऱ्यांच्या वतीनं सभागृहात विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यापूर्वीच एक मोठी घटना घडली आहे. विधीमंडळ आवारात थेट वातावादी ते धक्काबुक्की होण्यापर्यंत सत्ताधाऱ्यांचेच दोन नेते भिडल्याचं पाहायला मिळालं. या वादामुळे शिंदे गटातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
मी तुमच्या घरचं खात नाही : महेंद्र थोरवे
महेंद्र थोरवे यांनी घडल्या प्रकाराबाबत सांगताना म्हटलं की, ''मुख्यमंत्री शिंदेसोबत आम्ही प्रामणिकपणे काम करत आहोत. गेल्या दोन महिन्यापासून मंत्री दादा भुसे यांच्या खात्यातील कामानिमित्त मी आणि भरत गोगावले त्यांचा सातत्याने पाठपुरावा करत आहोत. खासदार श्रीकांत शिंदेंनी आणि मुख्यमंत्र्यांनीही त्यांना काम करु घ्या असं सांगितलं आहे. पण. दादा भुसेंना सांगूनही त्यांनी ते जाणीवपूर्वक केलेलं नाही. त्या गोष्टी मी त्यांना विचारायला गेलो तर, ते माझ्यावरती थोडेसे चिडून बोलले. आम्ही प्रामाणिक आमदार, आम्ही आमचा स्वाभिमान विकणार नाही. मी तुमच्या खरी खायला येत नाही. मी सांगितलेलं काम जनतेचं काम माझ्या मतदार संघातील काम झालं पाहिजे, ही आमची इच्छा.''
दादा भुसेंनी आमदारांना आमदारांना रिस्पेक्ट दिली पाहिजे : थोरवे
दादा भुसे ॲरोगंट आहेत, आमदारांशी व्यवस्थितपणे वागत नाहीत, आमच्यामुळे ते मंत्री म्हणून त्यांनी आमदारांना रिस्पेक्ट दिली पाहिजे, आमदारांना विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे. त्या ठिकाणी आम्हाला अतिशय प्रेमाने त्या ठिकाणी विचारून आमदारांची कामे करत असतात, हे अपेक्षा मंत्र्यांकडून सुद्धा आहे, आम्ही लोकांचा प्रतिनिधित्व करतो, असं थोरवे म्हणाले आहेत.
भुसे-थोरवे वादावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देणं टाळलं
पत्रकारांनी दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यातील वादावर प्रश्न विचारला असता, मुख्यमंत्र्यांनी उत्तर देणं टाळलं. ''अरे काय तरी काय विचारताय, विषय अधिवेशनाचा आहे, त्यावर विचारा, अधिवेशनाबाबत विचारा'', असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थोरवे-भुसे वादावर बोलणं टाळलं.
विधानसभेच्या नाव लौकिकाला काळिमा : जितेंद्र आव्हाड
थोरवे-भुसे वादावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या धक्काबुक्कीवर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे, कोण भिडले, कोण नाही भिडले, हे मला माहित नाही, पण हे गंभीर आहे. महान नेत्यांची परंपरा या महाराष्ट्राने पाहिली, पण असा प्रकार कधी झाला नाही. विधानसभेचे नाव लौकिक होते पण, त्याला आज काळिमा फासला गेला. राजकारणातली आपण आपली क्रेडिबीटी संपवत चाललो आहोत. लोक म्हणतील हे राजकारणी असेच आहेत., असं मत आव्हाडांनी व्यक्त केलं आहे. नितेश राणे यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, मला तो विषय माहीत नाही. काही झालं तरी त्यांच्यामधील फेव्हीकॉलचा जोड एकनाथ शिंदे आहेत.
सभागृहात एकही मंत्री नाही आहे, हे खूप गंभीर आहे, त्यांना याचं भान राहिलं पाहिजे, या गोष्टीचा आता विसर पडत चालला आहे, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. अमोल आता आपण सत्तेत आहोत हे लक्षात राहू देत, असं प्रसाद लाड म्हणाले आहेत.
कोणताही वाद झाला नाही : शंभुराज देसाई
दरम्यान, शंभूराज देसाई यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे की, कोणताही राडा झालेला नाही. काय पुरावा आहे, मी माध्यमांना प्रश्न विचारतो, लॉबीमध्ये माध्यमांचा कुठला कॅमेरा नाही. तरी तुम्ही कसे चालवता, असं शंभुराज देसाईंनी म्हटलं आहे. एक मंत्री आणि आमदार चर्चा करत होते. चर्चा करताना फक्त आवाज वाढला. संबंधित आमदारांना आम्ही लॉबीमध्ये घेऊन चर्चा केली. वाद झाला नाही, कुणी भिडले नाही. बोलता बोलता मोठ्या आवाजात बोलले म्हणजे वाद झाला का, असा सवाल शंभुराज देसाईंनी विचारला आहे.
विधानपरिषदेत विरोधकांचा गदारोळ
राज्याचे मंत्री दादा भुसे आणि शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्यात विधानभवनात बाचाबाची झाल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित करत याबद्दल खुलासा करण्याची मागणी केली. या घटनेनबद्दल तपासून माहिती घेतली जाईल असं उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं. तसेच, तोपर्यंत अर्थसंकल्पावरील चर्चेला मंत्री केसरकर उत्तर देतील, असं त्या म्हणाल्या. मात्र, विरोधकांचं समाधान झालं नाही, यावेळी उपसभापती आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली आणि उपसभापतींनी उद्विग्न होऊन कामकाज एक तासासाठी तहकूब केलं.
पाहा व्हिडीओ