Shashikant Shinde on Sanjay Raut सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.  ही भेट केवळ एक योगायोग होती आणि त्यात कोणताही राजकीय हेतू नव्हता,असे स्पष्ट करत त्यांनी महाविकास आघाडीतील इतर नेत्यांना विनाकारण वक्तव्ये टाळण्याचा सल्ला दिला आहे.

Continues below advertisement

शरद पवारांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये

विधानभवनात सीमावादाच्या संदर्भात एक महत्त्वाची समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. शरद पवार हे देखील या बैठकीला हजर होते. बैठक संपल्यानंतर पवार साहेब तिथून निघाले असता काही वेळासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या केबिनमध्ये शरद पवार थांबले असता प्रोटोकॉलनुसार  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली व त्यांचा सत्कार केला. तिथे इतरही आमदार-खासदार उपस्थित होते. त्यामुळे या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढणे पूर्णपणे चुकीचे आहे."

संजय राऊत यांनी गद्दारांच्या छताखाली बैठक कशासाठी असा आक्षेप घेतला होता. यावर बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले विधानभवनात विविध पक्षांची कार्यालये वेगवेगळ्या मजल्यावर आहेत. पवार साहेब ज्या केबिनमध्ये गेले होते ती विधिमंडळाची केबिन होती वैयक्तिक कोणाची नव्हती. राजकारणात अशा भेटीगाठी होतच असतात. पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे साहेब एकाच विमानाने नागपूरला गेले होते. तेव्हा आम्ही कधीही आक्षेप घेतला नाही. त्यामुळे मविआ नेत्यांनी केवळ बातमी तयार व्हावी यासाठी अशी वक्तव्ये करू नयेत.

Continues below advertisement

शरद पवार गट एनडीएमध्ये  सामील होणार असल्याच्या सर्व चर्चांना शशिकांत शिंदे यांनी पूर्णपणे फेटाळून लावले आहे. ते म्हणालेकालच पक्षाचे सर्व आमदार आणि खासदारांनी शरद पवार साहेबांची भेट घेतली असून सर्वजण पक्षाशी एकनिष्ठ आहेत.चर्चांमध्ये तथ्य नाही: एनडीएमध्ये जाण्याबाबत पक्षात कोणतीही चर्चा सुरू नाही आणि तसा कोणताही विषय उद्भवू शकत नाही.आगामी काळात महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये अधिक चांगला समन्वय राखण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू, असं शशिकांत शिंदे म्हणाले. 

संजय राऊत काय म्हणाले होते?

ज्या गद्दाराने आपले सरकार पाडले, त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन अशाप्रकारच्या बैठका घेतल्या तर यामुळे मोठ्या नेत्याची विश्वासार्हता कमी होते.  आम्ही त्यांच्या जागी असतो तर आम्ही अजितदादांच्या दालनात जाऊन बैठक घेतली नसती. शरद पवार यांनी काय करावं हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. पण एकनाथ शिंदेंच्या दालनात तुम्ही येता आणि तुमच्या पक्षाची बैठक घेता, ही कृती शिवसेनेला दुखावणारी आहे, असं खासदार संजय राऊत म्हणाले होते.