काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने जेजुरीमध्ये एका कार्यक्रमासाठी आल्या असता बोलताना शर्मिला ठाकरे यांनी ज्ञानेश कुमारांवर हल्लाबोल केला.

मुंबई : देशभरात सध्या आंदोलन सुरू असून, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (dyanesh kumar) यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात इंडिया आघाडीने सोमवारी दिल्लीत मोठा मोर्चा काढला होता. त्यानंतर, आज इंडिया आघाडीच्या बैठकीतही आंदोलन सुरुच ठेवायचं ठरलं असून ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेतल्याशिवाय माघार नाही, असा निर्णय झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे मुंबईतही ठाकरेंनी हा मुद्दा उचलून धरला आहे. त्यातच, आता मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी (Sharmila thackeray) देखील ज्ञानेश कुमार यांच्यावर आरोप करत टीका केली.
नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने जेजुरीमध्ये एका कार्यक्रमासाठी आल्या असता बोलताना शर्मिला ठाकरे यांनी ज्ञानेश कुमारांवर हल्लाबोल केला. काम आपण करतो, कामं सांगायला लोक आपल्याकडे येतात. पण ज्ञानेश कुमार यांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात. त्यामुळे आपल्याला हे सगळं बंद करायचे आहे, अशा शब्दात राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावरुन टीका केली. खरं कामं करणारी जी माणसं आहेत, त्यासाठी आज तु्म्ही जेजुरीच्या खंडेरायाला नवस बोला, असे म्हणत जेजुरीतील पदाधिकाऱ्यांपुढे शर्मिला त्यांनी आपल्या मन की बात बोलून दाखवली. आई अंबेला देखील प्रार्थना करते, यंदा दुष्काळाचं मोठं संकट आहे, मी रस्त्यातही बघितलं सगळी पीकं जळून गेली आहेत. शेतकऱ्यांच्या ऊसाला देखील भाव मिळत नसल्याची खंत शर्मिला ठाकरेंनी यावेळी बोलून दाखवली.
दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईत एसआयआर आणि ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन करण्यात आलं. त्यात, आमदार आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी हिरिरीने सहभागी होत राज्याचं लक्ष वेधलं होतं. त्यानंतर, दुसऱ्या दिवशी मनसेच्यावतीने सह्यांची मोहीम राबविण्यात आली होती.
ज्ञानेश कुमार माफिया - संजय राऊत
ज्ञानेश कुमार माफिया आहे, त्याने सिस्टीमचे अपराधीकरण केले. याच्याशी कसं निपटायचं हे आम्हाला माहिती आहे, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांविरूद्धची लढाई, हा संघर्ष राहुल गांधींच्या नेतृत्वात सुरुच राहणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच, मोदी शाह घाबरून आतमध्ये बसले आहेत. दिल्लीच्या रस्त्यावर त्यांनी आर्म फोर्स लावले आहेत. मात्र, राहुल गांधी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन दिल्लीमध्ये सुरु राहील, प्रत्येक राज्यात सुरु राहील, असेही संजय राऊत यांनी सांगितले.
हेही वाचा






















