बारामती : आज बारामतीतील माळेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी माध्यमांशी संवाद साधताना अनेक गोष्टींवरती भाष्य केलं आहे. शिवसेना चिन्ह वाटप सुनावणीबाबत बोलताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, मी सांगू शकत नाही, काय होईल, शेवटी कोर्टाचा निकाल आहे, अजून सुनावण्या सुरू आहेत, संपलेल्या नाहीच, त्या आधी आपण भाष्य करायचं, तुम्ही त्याची नोंद घ्यायची, आठ दहा दिवस वाट पाहू आणि मग चर्चा करू, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे. (Sharad Pawar)
राज्यात महागाई वाढतानाचं चित्र आहे, याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की,माझं मत थोडा वेगळा आहे. आज राज्याची देशाची अर्थव्यवस्था अडचणीत जाते, महागाई वाढते लोकांना दैनंदिनच्या गरज आहे, त्याची पूर्तता करणं सुद्धा कुटुंबप्रमुखांना अवघड होत आहे. या सर्व गोष्टीवरून दुसरीकडे लक्ष न्यायचं त्यासाठी कळत नकळत सरकारच्या सहमतीने असे काही इशू घडत आहेत, शिक्षण असेल लोकांनी ती चर्चा करत बसावी आणि मूळ दुखणं आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करावं हे ठरवून होत आहे असं आम्हाला दिसतंय, असंही त्यांनी म्हटलं आहे.(Sharad Pawar)
कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे, त्यांच्या काही मागण्या आहेत त्यासाठी सरकारने स्वीकारलेले धोरण हे कसं चुकीचं आहे हे न्याय व्यवस्थेने स्पष्ट सांगितलं आहे. या व्यवस्थेने सरकारला एक प्रकारे कडक शब्दात सल्ला दिला आहे, तुम्ही या पद्धतीने निर्णय नाही घेतले तर आम्हाला काही निर्णय करावे लागतील. न्याय पद्धती ही शेवटी प्रशासकीय अधिकारी आपल्या हातात घेतात की काय याची चिंता वाटावी अशी स्थिती आज या सरकारने आणली आहे.
जीडीपीबाबात बोलताना शरद पवार म्हणाले की, देशाचे अर्थमंत्री आणि प्रधानमंत्री अर्थव्यवस्थेचे अतिशय सुंदर चित्र देशाचं आहे असं भासवण्याचा प्रयत्न करत आहेत. मूळ जे दुखणं आहे त्याकडे त्यांचं लक्ष नाही, आज त्यांचं लक्ष खाली आहे, त्यांची नोंद त्यांनी घेतली नाही असं दिसत आहे. लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी प्रधानमंत्री आंतरराष्ट्रीय पातळीवर काही गोष्टी बोलतायेत, आणि इथली वस्तूस्थिती एका दृष्टीने बाजूला ठेवत आहेत.
पंतप्रधान मोदींच्या बारामती दौऱ्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, ते येतो म्हणले आहेत. आम्ही त्यांना 16 ऑक्टोबरची तारीख दिली आहे, पण ती पुढे मागे होण्याची शक्यता आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स याची इन्स्टिट्यूट इथे उभा केली आहे, ती देशातील पहिली आहे. त्याची ते पाहणी करतील त्याचं एक प्रेझेंटेशन त्यांना द्यायचं आहे. आमच्या काही लोकांनी सुप्रियाच्या मुलीच्या लग्नात त्याचं प्रेझेंटेशन त्यांना दिलं होतं. पण त्यांना हे सविस्तर समजून घ्यायचं आहे तो कार्यक्रम इथे आहे, अशी माहिती देखील शरद पवारांनी दिली आहे.
साखरेच्या दराबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, याचा ऊस उत्पादकांना फायदा झाला आहे असं अजून तरी दिसत नाही. पण व्हायला पाहिजे. शेवटी दर वाढत आहेत, उत्पादन खर्चही वाढत आहे, पण जो पिकवतो. वाढत्या दारातील काही हिस्सा हा त्याच्याकडे गेला पाहिजे, आजच्या स्थितीला असं काही दिसत नाही. तर साखर आयातीच्या परिणामाबाबत बोलताना पवार म्हणाले, माझ्या मते आयात करणे योग्य नाही. इम्पोर्टेड साखर येणार, कधी त्याचा फायदा काय होईल हे आज सांगता येत नाही.
पावसाचा अभाव आणि दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, 100 टक्के मी सगळीकडे जात आहे, दुबार पेरणी सोडा, पिण्याच्या पाण्याचा आणि बाकीचे प्रश्न निर्माण होतील असे दिसत आहे. संबंध मराठवाडा दुष्काळाने होरपळून निघेल हे दिसत आहे, हे चित्र चांगलं नाही, पण इथे सर्वांनी मिळून संकटातील माणसाला संकटातून बाहेर काढायला हातभार लावला पाहिजे.
