Ajit Pawar Plane crash death: महाराष्ट्राचे भविष्यातील नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे आशेने पाहिले जात होते त्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी बारामती येथे अपघाती निधन झाले होते. अजित पवार (Ajit Pawar) हे बुधवारी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामती येथे येणार होते. त्यांचे विमान बारामती विमानतळावर उतरत असताना बाजूच्या शेतात कोसळले होते. यावेळी विमानाचा प्रचंड मोठा स्फोट होऊन अजित पवार यांच्यासह सहा जणांचा जागीच मृत्यू झाला होता. अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला होता. अजित पवार यांच्यावर आज बारामतीच्या (Baramati) विद्या प्रतिष्ठान येथे अंत्यसंस्कार केले जात आहेत. 

अजित पवार यांचे पार्थिव आज सकाळी काहीवेळ त्यांच्या काटेवाडी येथील निवासस्थानी आणण्यात आले होते. त्यानंतर काटेवाडी ते विद्या प्रतिष्ठान त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. ही अंत्ययात्रा विद्या प्रतिष्ठान येथे आली तेव्हा याठिकाणी हजारोंचा जनसमुदाय जमला होता. अजित पवार यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात उभारण्यात आलेल्या चौथऱ्यावर आणण्यात आले त्यावेळी याठिकाणी शोकाकुल वातावरण होते. अजित पवार यांच्या पार्थिवावसह पवार कुटुंबातील सर्वजण याठिकाणी आले. पोलिसांनी अजित पवार यांचे पार्थिव अंत्यविधीसाठी  खाली ठेवले. त्याच्या अगदी समोर शरद पवार हे बसलेले होते. ते एकटक अजित पवार यांच्या पार्थिवाकडे बघत होते. अजित पवार यांचा निपचित पडलेला देह आणि त्याकडे एकटक पाहणारे शरद पवार, हे चित्र महाराष्ट्राच्या काळजाला चटका लावणारे ठरले. 

शरद पवार यांचे वय झाल्यामुळे त्यांनी अलीकडे राजकारणापासून दूर राहायला सुरुवात केली होती. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शरद पवार यांनी प्रचार केला नव्हता. याच काळात दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. त्यामुळे आता शरद पवार हे राजकारणातून बाजूला होऊन बारामती आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे अजित पवार यांच्या हातात देतील, असा कयास बांधला जात होता. मात्र, आता त्याच शरद पवार यांच्यावर अजित पवार यांचा मृ्त्यू पाहण्याची वेळ आली आहे. अजित पवार हे पवार घराण्याचा वारसा पुढे नेणार होते. मात्र,  शरद पवार यांचा हाच खंदा आधार आता हरपला आहे. हे विदारक चित्र अनेकांच्या मनाला चटका लावणारे आहे.

आणखी वाचा

शरद पवारांचा खंदा आधार गेला, राज ठाकरे धीर द्यायला पोहोचले, दोघे समोरासमोर येताच काय घडलं?