Sharad Pawar Varkari Community Controversy: वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी झाल्याचे प्रतिपादन राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले आहे. महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशित स्मरणिकेत त्यांनी याबाबत भाष्य केले. वारकरी संप्रदायात सुमारे 60 टक्के लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच, या प्रबोधनाच्या मार्गावर महिलांचा अभाव असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, या वक्तव्यावरून भाजपने शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले म्हणाले की, हिंदू धर्माचा आणि वारकरी संप्रदायाचा कायम द्वेष करणाऱ्या मौलाना शरद पवारांना आता वारकरी संप्रदाय धर्मांध वाटू लागला आहे. जेव्हा तुम्ही जाळीदार टोपी घालून त्या लोकांसोबत इफ्तार पार्ट्या झोडतात ते तुम्हाला धर्मांध वाटत नाही. पण राम कृष्ण हरी आणि ज्ञानोबा तुकोबांचा गजर करत सामाजिक समता जोपासणारा आमचा संप्रदाय तुम्हाला धर्मांध वाटायला लागलेला आहे. तुम्ही आयुष्यभर वारकरी संप्रदाय हिंदू धर्मापासून तोडण्यासाठी कारस्थानं केलीत. आता 40-50 लोकांची टोळी त्यासाठी तयार केलेली आहे. पण, लक्षात ठेवा हा तुषार भोसले जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुमचे षडयंत्र मी शिजू देणार नाही, अशी टीका त्यांनी शरद पवार यांच्यावर केलीय.
Navnath Ban on Sharad Pawar: धर्मांध शक्ती वारकरी संप्रदायात नाही: नवनाथ बन
भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे की, चिकित्सा करण्याचा त्यांना अधिकार आहे. अर्बन नक्षल देखील वारकरी संप्रदायात आली होती. त्याचा देखील तपास शरद पवार यांच्या रिसर्च टीमनं केला पाहिजे. वारकरी संप्रदायात लोकांचे प्रबोधन करणं याला महत्त्व असतं. अर्बन नक्षल यात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. यात किती शिरलेत याची माहिती देखील आपण समोर ठेवावी. धर्मांध शक्ती वारकरी संप्रदायात नाही, लव्ह जिहाद काहींकडून केला जातो. यावर मात्र शरद पवार बोलत नाहीत. प्रबोधन केलं जाते, त्याला धर्मांधता म्हणत नाही. विठ्ठलाची आराधना करणं धर्मांधता नाही, अशी टीका त्यांनी केलीय.
Sharad Pawar: विश्व वारकरी सेनेकडूनही शरद पवारांच्या वक्तव्याचा समाचार
दरम्यान, विश्व वारकरी सेनेचे हभप गणेश महाराज शेटे यांनी शरद पवारांच्या वक्तव्याचा समाचार आहे. वारकरी संप्रदायाने आजपर्यंत अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम केलं आहे. सर्व धर्मांना सामावून घेण्याचं काम वारकरी संप्रदायाने केलं आहे. पण, जर हिंदू धर्मावर कोणी आघात करत असेल तर त्याची गय केल्या जाणार नाही. नाशिकचं खरात प्रकरण पूर्ण जगात गाजलं आहे, त्याचा समर्थन कोणीही केलेलं नाही. सर्व वारकऱ्यांनी व कीर्तनकारांनी खरातचा निषेधच केला आहे. पण नाशिकमध्ये आमिष दाखवून हिंदूंच्या मुलींवर अत्याचार केला गेला. त्यांचं धर्मांतर केलं गेलं. लव्ह जिहादचं त्यांना शिकार करण्यात आलं, अशा गोष्टींचा वारकरी संप्रदाय मात्र निषेधच करणार आहे. विरोधच करणार आहे साहेब!
आपण म्हणताय की, 60 टक्के वारकरी संप्रदायाची आम्ही यादी केली आहे की, जे राजकीय पक्षांचा प्रचार करतात. वारकरी संप्रदायाने आजपर्यंत वारकरी संप्रदायाचा विचार, प्रचार, प्रसार आणि प्रबोधनच केलं आहे. पण, लव्ह जिहादसारख्या प्रकरणाला आळा घालण्यासाठी एखादा राजकीय पक्ष पुढाकार घेऊन जर सहकार्य करत असेल तर आम्ही कीर्तनकार मंडळी सुद्धा जाहीरपणे त्या पक्षाचे समर्थन केल्याशिवाय राहणार नाही. हिंदू धर्मावर जर कुणी आघात आणि आक्रमण केलं तर वारकरी संप्रदाय त्याचा विरोध करेलच. आम्ही खंबीर आहोत. आमच्या अनेक कीर्तनकार महिला लव्ह जिहादच्या विरोधात प्रबोधन करत आहेत. वारकरी म्हणून वारकरी संप्रदाय सध्या चांगल्या मार्गाने चालू आहे. हा सनातन धर्म आहे आणि चालत राहील. मी जाहीरपणे सांगतो की, विश्व वारकरी सेनेच्या माध्यमातून जो कोणी राजकीय पक्ष हिंदू धर्माला सहकार्य करेल त्यासोबत आम्ही खंबीरपणे उभे राहू, असे हभप गणेश महाराज शेटे यांनी म्हटले आहे.
Sharad Pawar: वारकरी साहित्य परिषदेचीही शरद पवारांवर टीका
शरद पवारांच्या वारकरी संप्रदायाबाबतच्या वक्तव्यावर वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी देखील टीका केली आहे. शरद पवारांनी आतापर्यंत कधी कीर्तन ऐकले माहित नाही. घोंगडी पांघरून पवारांनी किर्तन ऐकले असावे आणि त्यामुळे त्यांनी या कीर्तनकारांमध्ये वर्गवारी केली आहे का? शरद पवारांनी कीर्तनकारांची वर्गवारी केलेली यादी जाहीर करावी म्हणजे आम्हाला समजेल की, कोणत्या कीर्तनकाराला बोलवावे आणि कोणत्या कीर्तनकाराला बोलवू नये, असे त्यांनी म्हटले.
Sharad Pawar: नेमकं काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार यांनी म्हटले आहे की, वारकरी संप्रदायासारख्या समतेच्या चळवळीतही हे प्रतिगामी लोक घुसखोरी करू लागले आहेत. वारकरी संप्रदायामध्ये 60 टक्के लोक हे बोलताना धर्मांध शक्तींना अधिक बळ मिळेल अशा पद्धतीने मांडणी करतात. म्हणून आता आम्ही यादी करायला सुरुवात केली आहे. आता साधारण चाळीसएक लोक असे दिसतात की ते वारकरी संप्रदायांमध्ये कीर्तन प्रवचन यामधून पुरोगामी भूमिका मांडत असतात. त्यांची अत्यंत गरज आहे. दुर्दैवाने या प्रबोधनाच्या मार्गावर कुठे महिला दिसत नाहीत, अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
आणखी वाचा
