Sharad Pawar : 1999 साली अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांचे सरकार एका मताने पडल्याचा किस्सा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितला आहे. मतदानापूर्वी आठ ते दहा मिनिट आधी सत्ताधाऱ्यांचा एक खासदार फोडला असे म्हणत सरकार पाडण्याविषयीची ही गोष्ट मी पहिल्यांदाच सांगत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

गुरुवारी दिल्ली येथे निलेशकुमार कुलकर्णी लिखित 'संसद भवन ते सेंट्रल विस्टा : आठवणींचा कर्तव्यपथ' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी 1999 साली अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार पाडल्याचा किस्सा भाषणात सांगितला आहे. 

नेमकं काय म्हणाले शरद पवार? 

शरद पवार भाषणात म्हणाले की, मी संसदेत विरोधी पक्ष नेता होतो. माझ्या विरोधी पक्षनेत्याच्या काळात मी एक काम केले होते. तेव्हा अटल बिहारी वाजपेयींचे सरकार होते. अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना मी विरोधी पक्ष नेता होतो, तेव्हा आम्ही अविश्वास ठराव आणला होता. तो ठराव एकमताने मंजूरही झाला. ते एक मत मी मिळवले होते. ते कसे मिळवले हे सांगत नाही. ठराव मांडला, ठरावावर चर्चा झाली. चर्चा संपल्यानंतर मतदानापूर्वी काही वेळ असतो, त्यावेळी मी सभागृहातून बाहेर पडलो आणि परत आलो. यानंतर सत्ताधाऱ्यांमधील एका व्यक्तीने काही वेगळा निर्णय घेतला. एका मताने सरकार पडलं, असा किस्सा शरद पवारांनी सांगितला आहे.  

राऊतांच्या टीकेवर शरद पवारांचं वक्तव्य

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्लीत महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला होता. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. संजय राऊतांनी केलेल्या टीकेनंतर शरद पवार आणि संजय राऊत हे गुरुवारी पुस्तक सोहळ्याच्या कार्यक्रमाला पहिल्यांदाच एकत्र आले होते. शरद पवारांनी आपल्या भाषणात राऊतांनी केलेल्या टीकेवर वक्तव्य केलंय. त्यांनी म्हटलंय की,  गेले दहा-बारा दिवस संजय राऊतांची आणि माझी गाठ नव्हती. साधारणतः आमची रोज गाठ-भेट होते. सकाळपासून एकच बातमी पाहतोय की, हे दोघं भेटणार. मला काही समजत नाही एखाद्या बाबतीत एखाद्याचे मत असेल आणि ते प्रामाणिक असेल तर त्याला ते मांडण्याचा अधिकार आहे की नाही? आणि ते मत मांडलं म्हणून लगेच विसंवाद होऊ शकत नाही. संजय राऊत यांनी आपल्या आयुष्यातला मोठा काळ ज्यांच्या समवेत घालवला, ज्यांच्याकडून ते शिकले अशा सगळ्या विचाराचे लोक कधीही संकुचित विचार करू शकत नाहीत ते व्यापकच विचार करतील, असे त्यांनी म्हटले. 

आणखी वाचा 

Sanjay Raut : अजित पवार सोडा, फडणवीसांनीच मुंडे, कोकाटेंचा राजीनामा घ्यावा; संजय राऊत कडाडले, सुरेश धसांनाही डिवचलं