Sharad Pawar on NCP Merger: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सातत्याने चर्चेचा विषय ठरत असलेल्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत (NCP Merger) आता खुद्द शरद पवार यांनीच भाष्य केले आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याचा संबंधच नाही, असे शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले. ते मंगळवारी बारामती येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शरद पवार यांनी हे वक्तव्य करुन राजकीय वर्तुळाला पुन्हा एका संभ्रमात टाकले आहे. काही दिवसांपूर्वीच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाला सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा विरोध असल्याची कुजबुज समोर आली होती. त्यानंतर आता शरद पवार यांनीही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची शक्यता थेटपणे उडवून लावल्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात नेमकं काय सुरु आहे, याबाबतचा संभ्रम आणखीनच वाढला आहे. (Maharashtra Politics news)
काही दिवसांपूर्वीच दिल्लीत पार्थ पवार आणि प्रफुल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. दिल्लीत जंतर मंतर येथे दिल्ली पोलिसांनी 20 जुलैला आंदोलकांवर लाठीमार केला होता. त्याच्या दुसऱ्या दिवशी शरद पवार आणि सुप्रिया सुळे पंतप्रधान मोदी यांना संसदेत भेटले होते. यावेळी शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्यात तब्बल अर्धा तास चर्चा झाली होती. यानंतर दुसऱ्याच दिवशी पार्थ पवार आणि प्रफुल पटेल हे शरद पवार यांना भेटायला गेल्याची माहिती आहे. तसेच अलीकडेच अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही अमित शाह यांची भेट घेतली होती. गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएसोबत सत्तेत सामील होणार, अशी जोरदार चर्चा आहे. मात्र, भाजप नेतृत्त्वाने शरद पवार यांनी राष्ट्रवादीत विलीन होऊनच एनडीएसोबत यावे, अशी घट घातली होती. यामुळे पार्थ पवार व प्रफुल पटेलांनी शरद पवारांची भेट घेतल्याने राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या प्रक्रियेला वेग आल्याची अटकळ बांधली जात होती. मात्र, शरद पवार यांनी आज बारामतीत दिलेल्या प्रतिक्रियेने या चर्चेत फारसे तथ्य नसल्याचे दिसून येत आहे.
Rohit Pawar: मी एनडीएसोबत जाणार नाही: रोहित पवार
रोहित पवार यांनी शरद पवार हे एनडीएसोबत जाणार असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला. विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी शरद पवार मोदींना भेटले. युवा वर्गावर होणारा अन्याय त्यांनी मांडला आहे. सुप्रिया सुळे या अमित शाह यांना भेटल्या. 10 ऑगस्टला दिल्लीत रेवती सुळे-सारंग लखानी यांच्या लग्नाचे रिसेप्शन होणार आहे. त्या कार्यक्रमाला खासदार केंद्रीय मंत्री देखील येणार आहेत. शरद पवार एनडीएसोबत जाणार नाहीत. आमच्याकडचे बहुतांश आमदार-खासदार लढाईला तयार आहेत. मी लोकांसोबत, विचारासोबत राहिलो आहे. त्यामुळे पुढे जाऊन देखील मी लढणार आहे. एनडीए सोबत मी जाणार नाही, असे रोहित पवार यांनी ठणकावून सांगितले.
आणखी वाचा
