Sharad Pawar on Praful Patel: अजित पवार यांच्या निधनानंतर प्रफुल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपदावर ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरु आहे. प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे (Sunil Tatkare) या दोघांना शरद पवार (Sharad Pawar) गटासोबत पुन्हा जायचे नव्हते, त्यांना भाजपसोबत सत्तेत राहायचे होते, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) गोटात सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि प्रफुल पटेल (Praful Patel) यांच्याविषयी काहीसे संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रफुल पटेल यांनी पत्रकार परिषद घेऊन मी राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाही, दुसरी एखादी योग्य व्यक्ती राष्ट्रवादीची अध्यक्ष होईल. अजित पवार यांच्यानंतर योग्य व्यक्तीची निवड करणे माझी जबाबदारी आहे, असे स्पष्टीकरण प्रफुल पटेल यांनी दिले होते. तरीही प्रफुल पटेल यांच्याभोवती संशयाचे धुके अद्याप कमी झालेले नाही. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी बुधवारी बारामती येथील पत्रकार परिषदेत प्रफुल पटेल यांचा विषय निघताच बोलणे साफ टाळले.
सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर खूप घाई केली आणि सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला लावली, या चर्चेबाबत तुमचे म्हणणे काय आहे, असा प्रश्न शरद पवार यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. यावर शरद पवार यांनी, 'मला त्याच्यावर भाष्य करायचे नाही', असे सांगत प्रफुल पटेल आणि तटकरे यांच्याबाबत बोलण्यास स्पष्ट नकार दिला. तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनकरणाबाबत बोलताना शरद पवार यांनी म्हटले की, सध्या आम्हा लोकांसमोरचं जे संकट आहे, त्यामध्ये परस्परांना धीर देणं आणि परत उभं राहायचं, हे आमचं लक्ष्य आहे. राजकीय निर्णयांबाबत आम्ही कुठलीही चर्चा करत नाही. सुनेत्रा पवार यांचा शपथविधी झाला आनंद आहे, संधी दिली आनंद आहे, अशी मोघम टिप्पणी शरद पवार यांनी केली.
आणखी वाचा
भारत-अमेरिका व्यापार करारामुळे शेतकऱ्यांवर विपरीत परिणाम होऊ शकतो, शरद पवारांची भीती
अमोल मिटकरी म्हणाले, लाडकी बहीण योजनेला अजितदादांचं नाव द्या; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
