मुंबई : आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेत असलेल्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी पुन्हा एकदा राजकीय वक्तव्य केल्याने नवा वाद उद्भवला आहे. शरद पवार हे राष्ट्रद्रोही आहेत, असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं. तसेच, शरद पवारांबद्दल (Sharad Pawar) आणखी आक्षेपार्ह, वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. राजकीय वर्तुळातून या वक्तव्यावर विविध प्रतिक्रिया येत असून सत्ताधारी पक्षाचे नेते सावध, संयमी भूमिका घेत प्रतिक्रिया देणे टाळत असल्याचे दिसून येते.
संभाजी भिडे यांची धारातीर्थी यात्रा ही सध्या रायगड जिल्ह्याच्या कर्जतमधील लोहगड, भीमगड, अशा गडकिल्ले मोहिमसाठी सुरू आहे. यावेळी, यात्रेदरम्यान त्यांनी शरद पवारांवर जहरी टीका केली. शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह, ते जातिवंत आहेत. ते देशातील बदमाश आणि ***खोर आहेत, अशा शब्दात संभाजी भिंडेंनी त्यांच्यावर टीका केली. त्यामुळे, भिडेंच्या या वादग्रस्त विधानाने वातावरण तापण्याची शक्यता आहे. राज्यातील लवासाची अशी कीड काढून टाकली पाहिजे, असंही भिडेंनी म्हटलं. त्यामुळे,
शरद पवार महाराष्ट्रासाठी झिजणारं नेतृत्व - अंबादास दानवे
टीका टिपणी करणे अयोग्य आहे का योग्य आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. शरद पवार साहेबांना राष्ट्रद्रोही म्हणणे हे अतिशय चुकीचे आहे. शरद पवार साहेब हे या देशासाठी, महाराष्ट्रासाठी झिजणारं नेतृत्व आहे. त्यामुळे, अशा पद्धतीने देशद्रोहाचा आरोप लावणे एकदम चुकीचं आहे, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली. तर, शंभुराज देसाई यांनी ऐकल्यावर प्रतिक्रिया देईन, असे म्हटले.
संदर्भ समजून घेणं आवश्यक - देसाई
संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात मंत्री शंभुराज देसाईंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, संभाजी भिडे गुरुजी यांनी नेमके काय वक्तव्य केले आणि कोणत्या संदर्भात केले, हे ऐकल्याशिवाय प्रतिक्रिया देणे योग्य नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांबाबत वक्तव्य असेल तर त्याचा संपूर्ण संदर्भ समजून घेणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया शंभुराज देसाई यांनी दिली.
