Shambhuraj Desai Satara ZP Election: सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी शिवसेना आणि पोलिसांमध्ये झालेल्या अभुतपूर्व राड्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी सातारा पोलिसांना लक्ष्य केले. त्यादिवशी आमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) जे सदस्य होते, त्यांच्या मुलावर पोलिसांनी दबाव टाकून वडिलांच्या अपहरणाची खोटी तक्रार द्यायला लावली. अपहरणाचा ठपका शिवसेनेच्या दोन सदस्यांवर ठेवला. ते सगळेजण मतदानाच्या दिवशी आमच्यासोबत होते. मतदान कक्षाच्या जवळ असताना सातारा पोलिसांनी जबरदस्तीने आमच्या दोन सदस्यांना अपहरणाच्या आरोपाखाली ताब्यात घेतले. त्यावेळी मला पोलिसांनी धक्काबुक्की केली. दहा-दहा पोलीस मिळून मला ओढत होते. कोणी कंबरेला, कोणी दंडाला कोणी पाय खेचत होते. या झटापटीत मला जखम झाली. पोलीस त्यादिवशी अक्षरश: घरगड्यासारखे वागले, अशी टीका शंभुराज देसाई यांनी केली. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Satara ZP Election 2026)
अपहरणाचा आरोप असलेल्या शिवसेनेच्या सदस्यांना पोलिसांना ताब्यात घ्यायचे होत तर त्यांनी हॉटेलमध्ये बैठक सुरु असताना ही कारवाई का झाली नाही? ज्याठिकाणी ही बैठक सुरु होती, तिकडे शिवसेनेचे दीड -दोन हजार आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते. त्यामुळे साध्या वेशात हॉटेलबाहेर असलेल्या पोलिसांनी काहीही केले नाही. आम्ही मतदान कक्षापासून पाच ते दहा मीटरच्या अंतरावर असताना साध्या वेशातील पोलिसांनी आम्हाला घेरले. त्याठिकाणी मी, मंत्री मकरंद पाटील, शशिकांत शिंदे, खासदार नितीन पाटील, असे सगळेजण होते. पोलिसांनी आमच्याशी झटापट केली. मकरंद पाटील यांना धक्काबुक्की झाली. खासदार नितीन पाटील जमिनीवर पडले. आपण 302 च्या आरोपींनाही मतदानाला आणतो. मात्र, इकडे मतदानाला आलेल्या दोन सदस्यांना पोलिसांनी धक्काबुक्की करुन नेले, असे शंभुराज देसाई यांनी सांगितले.
आज शिवसेनेच्या बैठकीत मी या सगळ्या गोष्टी सांगणार आहे. महेश शिंदे यांच्या पत्नी या भाजपच्या तिकीटावर निवडून आल्या. आम्ही व्हीपचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार आहोत. आम्ही अजून मुंबईत आहोत. साताऱ्यात गेल्यावर लोकांचा उद्रेक पाहायला मिळेल. पोलिसांना दोन हात करायचे होते तर आमचे कार्यकर्तेही सोडायचे होते, असेही शंभुराज देसाई यांनी म्हटले.
आणखी वाचा
Satara ZP Election : साताऱ्यात राजकीय राडा कसा घडला? Full VIDEO
