Shahaji bapu patil on Bajrang Sonwane: अजितदादांच्या मृत्यूचं भांडवल करू नका...; शहाजीबापू पाटलांची बजरंग सोनवणेंवर सडकून टीका
Shahaji bapu patil on Bajrang Sonwane: अजित पवारांच्या विमानात बॉम्ब होता का? हे तपासलं पाहिजे, असे वक्तव्य बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केले होते.

Shahaji Bapu Patil on Bajrang Sonwane: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर (Ajit Pawar Death Plane Crash) सुरू असलेल्या तर्कवितर्कांवर शिंदे गटाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. खासदार बजरंग सोनवणे यांनी “अजित पवारांच्या विमानात बॉम्ब होता का? याची चौकशी झाली पाहिजे,” असे विधान केल्यानंतर शहाजीबापू पाटील यांनी त्यांच्यावर थेट तोफ डागली आहे. फुकट प्रसिद्धीसाठी भडक बोलण्याचा उद्योग अलीकडे सुरू झाला असून, अजितदादांच्या मृत्यूचे भांडवल कोणी करू नये, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
सांगोला तालुक्यातील चीक महूद येथे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना शहाजीबापू पाटील यांनी बजरंग सोनवणे यांच्या वक्तव्याचा तीव्र समाचार घेतला. शहाजीबापू पाटील म्हणाले, अजित पवार यांचा विमान अपघात हा तांत्रिक स्वरूपाचा आणि निव्वळ अपघात आहे. फरक एवढाच आहे की, नेमकी चूक विमानात होती की वैमानिकाची, एवढेच समोर यायचे राहिले असल्याचे त्यांनी म्हटले.
Shahaji Bapu Patil on Bajrang Sonwane: अजितदादांच्या मृत्यूचं भांडवल करू नका
शहाजीबापू पुढे म्हणाले की, देशाचे संरक्षण मंत्री राहिलेले आणि जगातील सुंदर, चांगली विमाने ज्यांनी पाहिले आहेत, असे शरद पवार साहेबांनी देखील हा निव्वळ अपघात आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे विनाकारण अजितदादांच्या मृत्यूचे कोणी कृपा करून भांडवल करू नका, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
Bajrang Sonwane on Ajit Pawar Death: बजरंग सोनवणेंनी उपस्थित केले होते प्रश्न
दरम्यान, खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. विमानात बॉम्ब होता का, याची चौकशी झाली पाहिजे, असा दावा करत त्यांनी घरून निघतानाचे सीसीटीव्ही फुटेज, विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करण्याची मागणी केली होती. विमानात सहा जण होते, मग पाच मृतदेहच कसे सापडले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.
Shahaji Bapu Patil on ZP Election: जिल्हा परिषद निवडणुकीवर शहाजीबापू पाटलांचं भाष्य
जिल्हा परिषद निवडणुकीबाबत बोलताना शहाजीबापू पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यावर महायुतीचाच झेंडा फडकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि शिंदे सेनेने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर काम केल्याचा दावा करत, सांगोला पंचायत समितीवर गेली 55 वर्षे असलेली शेकापची सत्ता उलथवून महायुतीचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
आणखी वाचा
























