नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतील (Delhi) जवाहरलाल नेहरू विद्यापीठात म्हणजे जेएनयू छत्रपती शिवाजी महाराज सामरिक अध्यासन केंद्र आणि कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासनाची आजपासून सुरुवात होत आहे. त्यासाठी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राज्यभाषा मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितात हा सोहळा संपन्न होत असतानाच दुसरीकडे एसएफआय म्हणजे स्टुंडट फेडरेशन ऑफ इंडियाच्यावतीने (SFI) या उद्घाटन सोहळ्याला विरोध करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या गेटवर येऊन आपल्या मागण्यांच्या अनुषंगाने विरोध दर्शवला आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या धोरणांना विरोध करत विद्यार्थी आक्रमक झाले होते, यावेळी त्यांच्याकडून घोषणाबाजी देखील करण्यात आली. 

Continues below advertisement

दिल्लीतील जेएनयूमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्राचा कोनशिला समारंभ आणि कुसुमाग्रज मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती विशेष अध्यासन केंद्राचे उदघाटन आज झाले. तत्पूर्वी येथील डाव्या विद्यार्थी संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याला विरोध केला होता. त्यामुळे, येथे मोठा पोलीस बंदोबस्त आणि जेएनयुतील सुरक्षा रक्षकांनी विद्यार्थ्यांना रोखले होते. 

देवेंद्र फडणवीस गो बॅक म्हणत जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली. महाराष्ट्रात जनसुरक्षा विधेयकास मंजुरी दिल्याच्या विरोधात आणि हिंदी भाषा सक्तीच्या करण्याच्या विरोधात आम्ही एकत्र येत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्‍यांच्या दिल्ली, जेएनयू दौऱ्याला विरोध करत असल्याचे आंदोलक विद्यार्थ्यांनी बोलताना म्हटले. समाजात विष कालविण्याचं काम महाराष्ट्रातील राजकारण्यांकडून होत आहे, द्वेष पसरवण्याचं काम केलं जातंय, मुसलमांना टार्गेट केलं जात आहे, असे म्हणत येथील एसएफआयच्या विद्यार्थ्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्याला आपला विरोध दर्शवला.  शिवाजी महाराजांचं नाव घेऊन, त्यांचं नाव देऊन तुम्ही समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करता, असेही येथील विद्यार्थ्यांनी म्हटलं. यावेळी, हाती डपली घेऊन, हाती बॅनर घेऊन त्यांनी महायुती सरकारविरोधात घोषणाबाजी केली. 

Continues below advertisement

केशव उपाध्येंकडून विद्यार्थी आंदोलनावर प्रतिक्रिया

‘जनसुरक्षा कायदा मागे घ्या’चे फलक हाती घेऊन 'एसएफआय' या डाव्यांच्या विद्यार्थी संघटनेने केलेले आंदोलन हा पुन्हा एकदा छुपा अजेंडा आहे, असे भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करुन म्हटं. तसेच, महाराष्ट्राचे आराध्यदैवत आणि ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे जेएनयूत सुरु होत असलेल्या सामरिक अध्ययन केंद्राला विरोध हा त्यांचा मुख्य अजेंडा आहे. ही तीच मंडळी आहेत, ज्यांनी 'भारत तेरे तुकडे होंगे' अशा घोषणा दिल्या होत्या, असेही त्यांनी म्हटलं आहे. 

दिल्लीतील जेएनयूच्या कुलगुरुंचे मराठीवर प्रेम

येथील ⁠मराठी अध्यासन केंद्रास कुसुमाग्रज यांचं नाव देण्याची मागणी केली होती. त्यानुसार, महाराष्ट्र सरकारने आधी 2 कोटी रुपयांचा निधी असून आणखी तीन कोटींचा निधी दिला आहे. मराठी भाषेसंदर्भाने राजकारण करण्यापेक्षा साता समुद्राच्या पलिकडे मराठी भाषा नेण्याचं काम केल पाहिजे, असे म्हणत मंत्री उदय सामंत यांनी ठाकरे बंधूंना टोला लगावला होता. तसेच, जेएनयूच्या कुलगुरू या परराज्यातील असल्या तरी त्यांच मराठीवर प्रेम आहे, असेही त्यांनी म्हटलं. 

हेही वाचा

एकनाथ शिंदेंना श्री संत नामदेव महाराज पुरस्कार; सोबतीला शरद पवारांचे आमदार, पाहा फोटो