Sayaji Shinde on Omraje Nimbalkar: हिंदी, मराठी आणि दाक्षणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने घराघरात पोहोचलेले अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) गेल्या अनेक वर्षांपासून वृक्षारोपणाची जबाबदारी पेलताना दिसतात. अनेकदा त्यांच्या सोशल मीडियावरून ते वृक्षारोपण करण्याचा आवाहनही करत असतात. प्रसंगी जाब विचारायला आणि सरकारला खडसवायलाही ते मागे पुढे पाहत नाहीत. धाराशिवमध्ये वृक्ष लागवडीच्या एका कार्यक्रमात त्यांनी भर कार्यक्रमात खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांना 'जेवढी मतं मिळाली तेवढी झाडं लावणार' या त्यांच्या जुन्या आश्वासनाची आठवण करून देत 'कुठे आहेत ही झाडं? असा सवाल केला. वृक्ष लागवडीच्या विश्वविक्रमावरून आणि गिनीज रेकॉर्ड बनवून प्रश्न उपस्थित करत वनमोहिमेसारख्या विषयावरून अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोरदार टोलेबाजी केली. वृक्ष लागवडीचा कार्यक्रम सयाजी शिंदे यांच्या टोलेबाजी आणि नेत्यांचे उत्तरांमुळे चांगलाच रंगला होता.
नेमकं घडलं काय?
धाराशिवमध्ये हरित धाराशिव मोहीम अंतर्गत 12 तासात 10 लाखांहून अधिक देशी वृक्ष लागवडीचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आला. सलग दुसऱ्या वर्षी वृक्ष लागवड करत या विश्वविक्रम रचल्यानिमित एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अभिनेते सयाजी शिंदे उपस्थित होते. या कार्यक्रमात गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड वरून अनेक प्रश्न उपस्थित करत वनमोहिमेसारख्या विषयावरून अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोरदार टोलेबाजी केली.
'खासदार ओमराजे निंबाळकर यापूर्वी एकदा म्हणाले होते की जेवढ्या मतांनी निवडून आलो, तेवढी पाच लाख झाड लावणार. त्यांची बातमी पेपर मध्ये वाचून मी त्यांना भेटायला आलो होतो. हे झाड लावलीत असं ते म्हणतात. तेही एकदा चेक करायला हवं. असंच कोणावर विश्वास नाही ठेवायला पाहिजे. कुठे लावलीत? का गेली कुठेतरी लावून.. हे एकदा जर चेक करायला मिळाली तर आपण म्हणू शकतो की सगळेच आमदार खासदार खोटे बोलत नाहीत, खरं पण बोलणारे आहेत.लावले असतील तर खरंच चांगलंय, नाहीतर बोलणं फार सोपं असतं. फॉरेस्ट डिपार्टमेंट, कलेक्टर हे सगळे पगार घेऊन काम करतात. पण आम्ही 40 देवराया सुरू केल्या आहेत. ना कोणी सीएसआर दिलाय.50 लाखांचा वर टर्नओव्हर नाही. आणि 40 देवराया लागल्या आहेत. इथं तुमच्या दोन एकराला अडीच- तीन कोटी असतात. 50 लाखांच्या वर गेलो नाहीत तर एवढ्या देवराया कशा लागल्या? कारण आमची डोक्यातून पॉवर येते. हृदयातून पॉवर येते.'
'झाडे लावण्यासाठी हे नाटक कशाला पाहिजे'
पुढे गिनीज बुकवरून बोलताना ते म्हणाले ' इथं गिनीज बुकवाले कोण आहेत? तुम्ही गिनीज बुकवाले आम्हाला कायम भारावून टाकता. भीती पण दाखवता. तुम्ही खूप ग्रेट आहात का? आपल्याला सारखं वाटत असतं की हे गिनीज बुक रेकॉर्ड म्हणजे फार ग्रेट आहे. पण यामध्ये असं आहे का - 10 लाख झाड लागली, मग पुढची 10 वर्ष ती जगली असा रेकॉर्ड पाहिजे ना! ' बीडच्या प्रोजेक्टचं काय झालं? अजितदादा मला बोलत होते- मी म्हटलं असे लागत नसतात झाडं. 15 लाख झाड लावले. गिनीज बुकमध्ये नोंद केली. नंतर मला त्या प्रोजेक्टचे फोटो आले. मग पहिल्या वर्षी गिनीज बुकमध्ये गेलेला प्रोजेक्ट दुसऱ्या वर्षी ढासळला याची पण नोंद करा.. असं करता येईल का तुमच्या गिनीज बुकमध्ये? झाडे लावण्यासाठी हे नाटक कशाला पाहिजे? कारण माझं असं म्हणणं आहे-आईने जन्म दिल्यानंतर आपण पहिल्यांदा ऑक्सीजन घेतो.आणि हे ऑक्सिजन झाड देतं.त्यामुळे जगात आईनंतर मोठं कोण असेल तर ते झाड आहे,दुसरं कोणी नाही. श्वास ही झाडापासून अन्नही झाडापासून, बाकी तुम्ही काहीही करा. तुम्ही कितीही लहान असा मोठे असा..जगायला लायक असाल तर तुमच्या वय एवढे झाड तुम्ही लावायला हवेत.तरच तुम्ही जगायला लायक आहात.' असंही सयाजी शिंदे म्हणाले.
सयाजी शिंदेंच्या टोलेबाजीनंतर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी गिनीज बुक ऑफ रेकॉर्डवरील वक्तव्यावर दिलखुलास भाष्य केलं. आम्ही राजकारणी आहोत, आम्हाला मागे- पुढे खाली -वर सगळीकडे बघावं लागतं. सयाजी शिंदेंना त्याचं काहीही देणंघेणं नाही. असं सांगत आपल्याही नावावर एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड असल्याचा सांगितलं. नंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सयाजी शिंदे यांच्या वक्तव्यानंतर वृक्ष लागवडीचा पुरावा दाखवला. वृक्ष लागवडीचा कार्यक्रम सयाजी शिंदे यांची टोलेबाजी आणि नेत्यांचे उत्तरामुळे हा कार्यक्रम चांगलाच रंगला होता.
