MPSC News : MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
MPSC News : सरकारचा निर्णय होण्यास लागणारा कालावधी लक्षात घेऊन भिमनवार यांच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार अन्य सदस्याकडे सोपविण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

पुणे : पेपरफुटी प्रकरणानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या सचिवदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार (Saurabh Katiyar) यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली करण्यात आल्यानंतर सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार (Saurabh Katiyar) यांच्याकडे देण्यात आला आहे. तर विद्यमान अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर गेल्याने अध्यपदाचा अतिरिक्त कार्यभार अन्य सदस्याकडे सोपविण्याची प्रक्रिया सुरु आहे. लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटी प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने न्या. दिलीप भोसले यांची समिती गठीत केली असून त्यांना चौकशीसाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. राज्यपालांच्या मान्यतेनंतर चौकशी समितीची अधिसूचना निर्गमित होणार असून त्यानंतर समितीचे कामकाज सुरू होईल. समितीचा अहवाल आणि त्यावरील सरकारचा निर्णय होण्यास लागणारा कालावधी लक्षात घेऊन भीमनवार यांच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार अन्य सदस्याकडे सोपविण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
Rohit Pawar: MPSC आयोगाला नवीन सचिव (प्रभारी) लाभले... आता प्रतीक्षा नव्या अध्यक्षांची
यावरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी सोशल मिडीयावरती पोस्ट लिहून म्हटलं की, "MPSC आयोगाला नवीन सचिव (प्रभारी) लाभले... आता प्रतीक्षा नव्या अध्यक्षांची... दोन महिन्यांनी नवीन अध्यक्ष नक्कीच लाभतील, तेही विद्यार्थ्यांच्या मनातले...!,असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
MPSC आयोगाला नवीन सचिव (प्रभारी) लाभले... आता प्रतीक्षा नव्या अध्यक्षांची... दोन महिन्यांनी नवीन अध्यक्ष नक्कीच लाभतील, तेही विद्यार्थ्यांच्या मनातले...! #MPSC #MPSCStudents
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 14, 2026
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) पेपरफुटी प्रकरणात अध्यक्ष विवेक भीमनवार यांना तूर्त रजेवर पाठवण्यात आले असून, याद्वारे पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून निर्माण झालेली कोंडी सोडवण्यात सोमवारी राज्य सरकारला यश आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर, चौकशी पूर्ण होईपर्यंत पदावर कार्यरत न राहता रजेवर जाण्याचा निर्णय भीमनवार यांनी जाहीर केला. आपण संपूर्ण आयुष्यात नैतिकतेला नेहमी प्राधान्य दिले असल्याचे स्पष्ट करत ते रजेवर गेले आहेत. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी राज्य सरकारने न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत केली असून, त्यांना चौकशीसाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. या न्यायालयीन चौकशी समितीच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली असून, त्याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठविण्यात आला आहे. राज्यपालांच्या मान्यतेनंतर या चौकशी समितीची अधिसूचना निर्गमित केली जाईल आणि त्यानंतर समितीचे अधिकृत कामकाज सुरू होईल.समितीचा अहवाल आणि त्यावर सरकारकडून निर्णय येण्यास लागणारा कालावधी लक्षात घेता, विवेक भीमनवार यांच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार आयोगाच्या अन्य सदस्याकडे सोपविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.






















