Satyajeet Tambe on Sanjay Gaikwad: बुलढाण्यातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी 'शिवाजी कोण होता?' (Shivaji Kon Hota?) या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी (Prashant Ambi) यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण राज्यात चर्चेचा विषय ठरले आहे. यावरून संजय गायकवाड यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली असून नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी देखील या प्रकरणात उडी घेत संजय गायकवाड यांच्यावर हल्लाबोल केलाय.
सत्यजीत तांबे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, चुकीच्या पद्धतीने का होईना, संजय गायकवाड यांनी एका अत्यंत महत्त्वपूर्ण विषयाला, हात घालून राज्यात पुन्हा एकदा “शिवाजी कोण होता?” या विषयावर चर्चा सुरू करून दिली. त्याच बरोबर “लोकप्रतिनीधी कसा नसावा” यावरही चर्चा सुरु करुन दिली. खरं तर, या विषयाची चर्चा नव्या पिढीत होणं अत्यंत गरजेचं होतं. कॉ. गोविंद पानसरे यांचं “शिवाजी कोण होता?” हे पुस्तक 1987 साली प्रकाशित झालं. म्हणजे आज जवळपास 39 वर्षांनंतरही पुस्तक न वाचता हा विषय पुन्हा चर्चेत आणला आहे आणि त्यातूनच या पुस्तकाचं महत्त्व पुन्हा अधोरेखित होतं.
Satyajeet Tambe on Sanjay Gaikwad: 'ती' आठवण आज पुन्हा ताजी झाली
मागच्याच आठवड्यात माझी मुलगी अहिल्यासोबत गप्पा मारताना तिने एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. “बाबा, तुम्ही सांगता ते आणि शाळेत शिकवतात ते शिवाजी महाराज वेगळे का वाटतात?” यातून एक गोष्ट स्पष्ट झाली, आजच्या नव्या पिढीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची खरी आणि समतोल ओळख पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. 16 फेब्रुवारी 2015 रोजी कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर भ्याड हल्ला झाला आणि 20 फेब्रुवारी 2015 रोजी त्यांचं निधन झालं. नेमके त्याच काळात 19 फेब्रुवारीला शिवजयंती होती, पानसरेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही नगर शहरात “शिवाजी कोण होता?” या पुस्तकाच्या सुमारे 10,000 प्रती वाटून प्रबोधन करण्याचा छोटासा प्रयत्न केला होता… ती आठवण आज पुन्हा ताजी झाली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य उभं करताना बारा बलुतेदार, अठरा पगड जाती आणि सर्व धर्मांच्या लोकांना सोबत घेत एक समावेशक स्वराज्य उभारलं. स्वराज्य म्हणजे एक प्रकारे लोकशाहीवादी विचारच होता ज्यात राजाने जनतेला लुटून ऐश-आराम करण्यापेक्षा रयतेला केंद्रबिंदू ठेवून राज्यकारभार करणे होय. आज महाराष्ट्र ज्या उंचीवर उभा आहे, त्यामागे हाच विचार मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. म्हणूनच, ही चर्चा केवळ वादासाठी नव्हे, तर योग्य समज, अभ्यास आणि पुढील पिढीला दिशा देण्यासाठी व्हावी, हीच अपेक्षा, असे सत्यजीत तांबे यांनी म्हटले आहे.
Satyajeet Tambe on Sanjay Gaikwad: फोनवरचे संभाषण ऐकून हसावे की रडावे असे झाले
सत्यजीत तांबे पुढे म्हणाले की, संजय गायकवाड यांचे फोनवरचे संभाषण ऐकून हसावे की रडावे असे झाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी 'परस्त्रीला आई मानावे' हा दंडक घालून दिला होता. शिवाजी महाराज स्वराज्य आणि शत्रूपक्षातील स्त्रियांचाही नेहमी आदर करत असत, त्यामुळे गायकवाड यांनी वापरलेल्या शब्दांमुळे महाराज कधीच माफ करणार नाहीत, हेही तितकेच खरे, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा
प्रकाशकाला केलेल्या शिवीगाळबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण...; संजय गायकवाडांना उपरती, भूमिकेवर ठाम
