SDCCB Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चुरस; 21 जागांसाठी 236 अर्ज..चार मंत्री, दोन खासदार, दोन आमदारांसह अनेक दिग्गज नेते मैदानात..
SDCCB Election: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत कोण बिनविरोध निवडून येणार? कोण मैदानात राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. सातारा जिल्हा बँकेच्या संचालकपदाच्या 21 जागांसाठी 236 अर्ज दाखल झाले आहेत. चार मंत्री, दोन खासदार, दोन आमदारांसह अनेक दिग्गज नेते सातारा जिल्हा बँक निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीचा जागावाटपाचा तिढा कायम आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपची तयारी सुरु असून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना बाजूला ठेवलंय गेलंय का याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.
SDCCB Election: सातारा जिल्हा बँकेच्या 21 जागांसाठी 236 अर्ज
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 संचालक पदांसाठी तब्बल 236 अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकीय चुरस वाढली आहे.या निवडणुकीच्या रिंगणात मंत्री जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले, मकरंद पाटील आणि शंभूराज देसाई यांच्यासह खासदार उदयनराजे भोसले, खासदार नितीनकाका पाटील, दोन आमदार आणि अनेक दिग्गज नेत्यांनी अर्ज दाखल केले आहेत.
आज 5 ऑक्टोबरला अर्जांची अंतिम छाननी होणार असून त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मोठी राजकीय रस्सीखेच सुरू होणार आहे. माघारीनंतरच जिल्हा बँकेच्या निवडणुकीचं अंतिम चित्र स्पष्ट होणार असून, कोण कोण बिनविरोध होणार? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.दरम्यान, महायुतीमध्ये जागावाटपासाठी बैठकांचं सत्र सुरू आहे.
मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांच्या बैठका होत असून जागावाटपाचा तिढा अद्याप कायम आहे.11 तालुक्यांमधील विविध कार्यकारी सोसायटीच्या जागा स्थानिक पातळीवर लढवल्या जातील, तर उर्वरित जिल्हा कॅटेगरीतील दहा जागांचं वाटप ठरावांच्या संख्येनुसार पक्षांना केलं जाईल, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे.सध्या कोणत्याही पक्षाला ठराविक जागांचा फॉर्म्युला निश्चित झालेला नाही. अर्ज छाननीनंतर पुढील दोन दिवसांत महायुतीची पुन्हा बैठक होणार असून, त्यानंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचं राजकीय चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भाजपकडून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेची निवडणूक लढवण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. त्याचवेळी मंत्री जयकुमार गोरे यांना निवडणूक प्रक्रियेपासून बाजूला ठेवण्यात आल्याच्या चर्चांनाही राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे.
सातारा जिल्हा बँक निवडणूक वेळापत्रक
उमेदवारी अर्ज दाखल करणे : 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर (11 ते 3 दरम्यान )
अर्जांची छाननी : 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता
वैध अर्जांची यादी प्रसिद्ध करणे : 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता
अर्ज मागे घेण्याची मुदत : 6 ते 21 ऑक्टोबर
निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी : 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता
मतदान : 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत
मतमोजणी : 3 नोव्हेंबर





















