Satara DCC Bank Election: प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेच्या (Satara District Central Co-operative Bank) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीत मंत्री शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांनी पुढाकार घेतला असून जिल्ह्यातील बड्या नेत्यांसोबत बंद दाराआड खलबतं सुरू केली आहेत.
Satara DCC Bank Election: पक्षीय राजकारण बाजूला ठेवून समन्वयाचा प्रयत्न
जिल्हा बँकेची ही निवडणूक पक्षीय राजकारण बाजूला ठेवून महायुतीच्या (Mahayuti) माध्यमातून एकमुखाने आणि सर्वसमावेशक पद्धतीने व्हावी, यासाठी शिवेंद्रराजे हे समन्वयाची भूमिका बजावत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि महायुतीतील इतर प्रमुख नेत्यांची मनधरणी सुरू केली आहे. यासाठी मंत्री मकरंद पाटील (Makarand Patil), रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) आणि खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्यासोबत त्यांच्या महत्त्वपूर्ण बैठका पार पडल्या आहेत.
Satara DCC Bank Election: शिवेंद्रराजेंच्या खांद्यावर एकमत घडवून आणण्याची जबाबदारी
सातारा जिल्हा बँकेवर नेहमीच जिल्ह्यातील प्रस्थापित घराण्यांचे व नेत्यांचे वर्चस्व राहिले आहे. या निवडणुकीत सर्व नेत्यांना एकाच व्यासपीठावर आणून एकमत घडवून आणण्याची मोठी जबाबदारी शिवेंद्रराजे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या या बैठकांमध्ये जागांचे वाटप, पॅनेलची रचना आणि निवडणूक रणनीती यावर सखोल चर्चा होत असल्याचे सूत्रांकडून समजते.
Satara DCC Bank Election: पूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून
जिल्ह्यातील विविध विचारसरणीच्या आणि राजकीय विरोधक मानल्या जाणाऱ्या नेत्यांचा मेळ घालत शिवेंद्रराजे भोसले नक्की कोणती नवी राजकीय रणनीती आखणार? आणि महायुतीतील सर्व गट एकत्र येऊन बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न करणार की पॅनेल विरुद्ध पॅनेल असा सामना रंगणार? याकडे आता साताऱ्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
Satara DCC Bank Election: शिवेंद्रराजे अन् उदयनराजेंची भेट, निवडणूक महायुतीतून एकत्र लढण्याचे संकेत
दरम्यान, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी 'जलमंदिर पॅलेस' येथे जाऊन खासदार उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये जिल्हा बँक निवडणुकीच्या रणनीतीवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली. ही निवडणूक महायुतीच्या माध्यमातून पूर्ण ताकदीने एकत्र लढवण्यावर दोघांचे एकमत झाल्याचे संकेत मिळत आहेत. दोन्ही राजे एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याने आता जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीची ताकद वाढणार असून राजकीय वर्तुळात या भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
