सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. आज त्यांनी 'जलमंदिर पॅलेस' येथे जाऊन खासदार उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये जिल्हा बँक निवडणुकीच्या रणनीतीवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली. 

Continues below advertisement

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून पूर्ण ताकदीने एकत्र लढवण्यावर खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे एकमत झाल्याचे संकेत मिळत आहेत. दोन्ही राजे एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याने आता जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीची ताकद वाढणार असून राजकीय वर्तुळात या भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे.

शिवेंद्रराजे भोसले आणि मकरंद पाटील यांच्यातही चर्चा 

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जाहीर झाली असून जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हा बँकेसाठी पहिल्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला. उदयनराजे भोसले आणि रामराजे नाईक निंबाळकर यांनी जिल्हा बँक निवडणुकीत राजकारण आणू नये अशी भूमिका घेतली. रामराजे नाईक निंबाळकर यांनी देखील या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सातारा जिल्हा बँक निवडणुकीच्या अनुषंगानं शिवेंद्रराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, अतुल भोसले यांच्यात साताऱ्यात बैठक झाली होती. यानंतर शिवेंद्रराजे भोसले आणि मंत्री मकरंद पाटील यांच्यात देखील चर्चा झाली. 

Continues below advertisement

दरम्यान, महायुतीतील घटक पक्षांशी चर्चा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असं मंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटलं होतं. मात्र समाधानकारक तोडगा निघाला नाही, तर भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवून विजय मिळवेल, असा दावा देखील त्यांनी केल्याचं पाहायला मिळालं.

सातारा जिल्हा बँक निवडणूक वेळापत्रक

उमेदवारी अर्ज दाखल करणे : 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर  (11 ते 3 दरम्यान )

अर्जांची छाननी : 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता

वैध अर्जांची यादी प्रसिद्ध करणे : 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता

अर्ज मागे घेण्याची मुदत : 6 ते 21 ऑक्टोबर

निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी : 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता

मतदान  : 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत

मतमोजणी : 3 नोव्हेंबर